म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभु येईपर्यंत न्यायनिवाडा करु नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंत: करणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरीता व अपुल्लोसाभरीता लागू केल्या आहेत. यासाठी की ‘पवित्र शास्त्र सांगते त्यापलीकडे जाऊ नका,ʆ हे आमच्या उदाहरणावरुन तुम्ही शिकावे व तुम्ही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करु नये.
कोण म्हणतो की तू दुसऱ्यापेक्षा चांगला आहेस? आणि तुझ्याजवळ असे काय आहे जे तुला मिळाले नाही? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
तुम्हांला असे वाटते की, तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हांला असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही खरोखरच राजे होता, यासाठी की आम्ही तुमच्यासह राजे झालो असतो.
कारण मला वाटते की देवाने आम्हांला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जाहीर प्रदर्शनसारखे झालो आहोत.
आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये किती हुशार आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही किती बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!
जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद दतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.
यासाठीच तिमथ्याला तुमच्याकडे पाठविले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी त्यांना सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवितो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणूकीची आठवण करुन देईल.
तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले वक्ते आहेत हे नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत, हे मला समजेल.