Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Judges Chapters

Judges 4 Verses

Bible Versions

Books

Judges Chapters

Judges 4 Verses

1 एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली.
2 तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इस्राएल लोकांचा पराभव करु दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. हरोशेथ या नगरात सीसरा राहात होता.
3 सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.
4 तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती.
5 एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्राएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते.
6 तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश या नगरात राहात असे. दबोरा त्याला म्हणाली, “इस्राएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील दहाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा.
7 मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन.
8 त्यावर बाराक दबोराला म्हणाला, “तूही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन. तू नसलीस तर मात्र करणार नाही.”
9 दबोरा म्हणाली, “अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे.”आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली.
10 तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.
11 हेबेर नावाचा एक माणूस केनी लोकांमध्ये होता. तो आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. (केनी लोक होबाबचे वंशज होते. होबाब म्हणजे मोशेचा सासरा) केदेशजवळच्या साननीम येथे एलोन वृक्षाजवळ हेबेरने तळ दिला होता.
12 अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरापाशी आला असल्याचे कोणीतरी सीसराला सांगितले.
13 तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथपासून त्या सर्वांनी किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला.
14 तेव्हा दबोरा बाराकला म्हणाली, “आज सीसराचा पराभव करायला परमेश्वर तुला मदत करणार आहे. त्याने आधीच तुझा मार्ग मोकळा केला आहे हे तुला माहीतच आहे.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरुन दहाहजार माणसांसह निघाला.
15 त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लढाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला.
16 बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने व त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा व सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही.
17 पण सीसरा पळून गेला होता. तो हेबेरची बायको याएल हिच्या तंबूकडे आश्रयाला गेला. केनी हेबेर आणि हासोरचा राजा याबीन यांच्यात सलोख्याचे संबेध होते. म्हणून सीसरा तेथे गेला.
18 याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.
19 सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थोडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामड्याच्या बुधल्यात ती दूध भरुन ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले.
20 तो तिला म्हणाला, “तू तंबूच्या दारात जाऊन उभी राहा आणि “आत कोणी आहे का?” असे कोणी विचारले तर “नाही” म्हणून सांग.”
21 मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.
22 तेवढचात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोंचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला.
23 त्या दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी कनान्यांचा राजा याबीन याचा पराभव केला.
24 या याबीनला नामोहरम करत शेवटी त्याचा नाश करीपर्यंत इस्राएल लोकांचे सामर्ध्य उत्तरोत्तर वाढत गेले.

Judges 4:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×