Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Genesis Chapters

Genesis 42 Verses

Bible Versions

Books

Genesis Chapters

Genesis 42 Verses

1 या सुमारास कनानमध्ये ही दुष्काळ पडला होता परंतु मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “आपण येथे काही न करता स्वस्थ का बसलो आहोत.
2 मिसर देशात धान्य मिळते असे मी ऐकले आहे. तुम्ही जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”
3 तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले.
4 याकोबाने, योसेफाचा सख्खा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही; कारण योसेफाप्रमाणे बन्यामीनावरही काही वाईट प्रसंग ओढवेल अशी त्याला भीती वाटली.
5 कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, म्हणून कनानातून पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकांत इस्राएलाचे मुलगेही होते.
6 त्या वेळी योसेफ मिसरचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी होता. बाहरेच्या देशातून धान्य विकत घ्यावयास मिसरमध्ये येणाऱ्या लोकांना धान्य विकण्याचा अधिकार केवळ योसेफालाच होता; म्हणून योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आणि त्यांनी त्याला लवून नमन केले.
7 योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले परंतु ते कोण आहेत हे माहित नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?”त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.”
8 योसेफाने आपल्या भावांना ओळखले परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही.
9 आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली.योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात! तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोरपणा हेरण्यास आला आहात.”
10 परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “नाही नाही, महाराज! आम्ही आपले दास खरोखर केवळ धान्य विकत घ्यावयास आलो आहोत.
11 आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे मुलगे आहोत. आम्ही प्रमाणिक म्हणजे खरेपणाने बोलणारे व चालणारे सरळ माणसे आहोत. आम्ही खरेच धान्य खरेदी करण्यास आलो आहोत.”
12 नंतर योसेफ त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमचा कमकुवतपणा पाहण्यास आलेले हेर आहात.”
13 परंतु ते भाऊ म्हणाले, “नाही नाही महाराज! आम्ही सर्व भाऊच आहोत. आमच्या कुटुंबातील आम्ही एका बापाचे बारा मुलगे आहोत. आमचा सर्वात धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे. आणि आमचा दुसरा एक भाऊ फार पूर्वी मरण पावला. कनान देशातले आम्ही सर्व आपल्या दासासमान आहोत.”
14 परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “नाही, माझे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही हेरच आहात;
15 परंतु तुम्ही खरे बोलत आहा हे पटवून देण्याची मी तुम्हाला एक संधी देतो; फारोची शपथ! मी वचन देतो की तुमचा धाकटा भाऊ येथे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही.
16 तेव्हा तुम्हातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकटया भावाला येथे घेऊन यावे, आणि तो पर्यंत तुम्ही इतरांनी येथे तुरुंगात राहावे; मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हास कळेल. परंतु माझी खात्री आहे की तुम्ही हेरच आहात.”
17 मग योसेफाने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले.
18 तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवभिरु माणूस आहे. म्हणून मी सांगतो तसेच करा, म्हणजे तुमच्या धाकट्या भावाला येथे आणून तुमचा खरेपणा पटवून द्या; मग मी तुम्हाला वाचवू शकेन.
19 तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावास येथे तुरुंगात ओलीस ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या माणसांकरिता धान्य घेऊन जा.
20 मग तुमच्या धाकट्या भावास येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल.” आणि तुम्हाला मरावे लागणार नाही.”तेव्हा तसे करण्यास ते भाऊ कबूल झाले.
21 ते एकमेकांस म्हणाले, “आपला धाकटा भाऊ योसेफ याच्याशी आपण वाईट रीतीने वागलो त्याचा बदला म्हणून आपणास ही शिक्षा होत आहे. त्याने त्याला सोडून द्यावे व त्याचा जीव वाचवावा म्हणून काकुळतीने रडून आपणास विनंती केली परंतु आपण त्याचे ऐकले नाही म्हणून आता आपणास हे भोगावे लागत आहे.”
22 मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगितले की त्या लहान भावाच्या जीवाला, वाईट रीतीने वागून काही अपाय करु नका; परंतु तुम्ही ते ऐकले नाही म्हणून आता त्याच्या मृत्यूबद्दल आपण ही शिक्षा भोगीत आहोत.”
23 योसेफ दुभाष्यातर्फे आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भोषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही. परंतु त्यांचे सर्व बोलणे योसेफाला समजले; त्यामुळे त्याला फार दु:ख झाले व
24 म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला थोडया वेळाने तो परत त्यांच्याकडे आला. आणि त्यांच्याशी बोलला इतर भाऊ पाहात असताना त्याने एका भावाला शिमोनला त्यांच्यातून काढून घेतले आणि बांधले.
25 मग आपल्या भावांच्या पोत्यात धान्य भरण्यास तसेच त्या धान्याबद्दल त्याच्या भावांनी दिलेला परंतु योसेफाने न घेतलेला पैसा गुपचूप ज्याच्या त्याच्या पोत्यात भरण्यास व त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेत खाण्यासाठी अन्नसामग्री देण्यास योसेफाने आपल्या काही सेवकांना सांगतिले.
26 तेव्हा त्या भावांनी ते धान्य आपापल्या गाढवावर लादले व तेथून ते माघारी जाण्यास निघाले.
27 ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेल पैसे त्याला त्या गोणीत आढळले.
28 तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.”
29 ते भाऊ कनान देशास आपला बाप याकोब याजकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या.
30 ते म्हणाले, “त्या देशाचा (मिसरचा) अधिपति म्हणजे प्रमुख अधिकारी आमच्याशी कठोरपणाने बोलला आम्ही हेर आहोत असे त्याला वाटले;
31 परंतु आम्ही हेर नसून प्रामाणिक म्हणजे खरेपणाने वागणारे सरळ माणसे आहोत असे त्याला सांगितले.
32 आम्ही त्याला सांगितले की आम्ही बारा भाऊ एका माणसाचे मुलगे आहोत आमचा एक भाऊ वारला तसेच आमचा सर्वात धाकटा भाऊ कनान देशात आजपर्यंत आमच्या बापाजवळच असतो असेही सांगितले.
33 “तेव्हा त्या देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आम्हाला म्हणाला, ‘तुम्ही प्रामाणिक व साळसूद लोक आहात हे पटवून देण्याचा एक मार्ग आहे; तो असा की तुम्ही तुम्हातील एका भावास येथे ओलीस माझ्यापाशी ठेवा; तुम्ही इतरजण तुमच्या कुटुंबातील माणसाकरिता धान्य घेऊन जा.
34 आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या; मग तुम्ही खरेच प्रामाणिक व साळसूद माणसे आहात हे मला पटेल; नाही तर मग तुम्ही तुमच्या सेनापतीच्या हुकुमाने आमचा नाश करावयास आला आहात असे मी समजेन; तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि मग तुम्हाला आपणाकरिता आमच्या देशातून धान्य विकत घेण्यासाठी ये जा करण्याची परवानगी असेल.”
35 मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले; तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैसाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले.
36 याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ गेला; शिमोनही गेला; आणि आता बन्यामीनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे!”
37 मग रऊबेन आपल्या बापास म्हणाला, “बाबा, मी जर बन्यामीनाला मागे आणले नाही तर माझे दोन मुलगे तुम्ही मारुन टाका; बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा! मी खरोखर बन्यामीनाला मागे तुमच्याकडे घेऊन येईन!”
38 परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामीनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही; त्याचा भाऊ मरण पावला आणि आता माझी बायको राहेल हिचा एवढा एकच मुलगा राहिला आहे. मिसरच्या फेरीत त्याला काही अपाय झाला तर त्यामुळे मला मरण येईल; आणि अतिशय दु:खी म्हातारा माणूस म्हणून तुम्ही मला कबरेत पाठवाल.”

Genesis 42:12 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×