Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

1 Kings Chapters

1 Kings 3 Verses

Bible Versions

Books

1 Kings Chapters

1 Kings 3 Verses

1 मिसरचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करुन शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरुशलेमभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते.
2 मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात.
3 शलमोनही आपले वडील दावीद यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे मन:पूर्वक पालन करुन परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. दावीदाने सांगितलेल्या गोष्टींखेरीज आणखीही एक गोष्ट तो करत असे. यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.
4 गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन एकदा यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.
5 तो गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्याला स्वप्नात दर्शन दिले देव म्हणाला, “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”
6 शलमोन तेव्हा म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडील यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते भलेपणाने आणि योग्य मार्गाने जगले. त्याच्यानंतर त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस.
7 माझ्या वडीलांनंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी अजाण मुलासारखाच आहे. माझे कर्तव्य बजावायला योग्य ते शहाणपण माझ्याजवळ नाही.
8 मी तुझा सेवक तू निवडलेल्या अक्षरश: अगणित अशा लोकांपैकी एक आहे. शासकाला तर अनेक निर्णय करावे लागतात.
9 तेव्हा राज्य करायला आणि लोकांशी न्यायबुध्दीने वागायला आवश्यक ते शहाणपण तू मला दे. त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज एवढ्या लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे.”
10 शलमोनाने हे मागितले याचा परमेश्वराला फार आनंद झाला
11 म्हणून देव त्याला म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस.
12 तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तू ज्ञानी आणि चाणाक्ष होशील तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही.
13 शिवाय तू न मागितलेल्या गोष्टीही बक्षीस म्हणून मी तुला देईन. आयुष्यभर तुला मानसन्मान थोर राजा कोणी असणार नाही.
14 मी दाखवलेल्या मार्गांने चाल आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळ. आपल्या वडीलांप्रमाणेच वाग. असे वागलास तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”
15 शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरुशलेमला जाऊन परमेश्वराच्या करारकोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यात त्याने परमेश्वराला शांतीअर्पणे वाहिली. मग आपल्या राज्यकारभारात ज्यांची मदत झाली त्या सर्व वडिलधाऱ्यांना आणि सेवकांना मेजवानी दिली.
16 एकदा दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या.
17 त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. आम्ही दोघी गर्भवती होतो आणि आमचे दिवस भरत आले होते. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती.
18 तीन दिवसांनंतर ही पण प्रसून झाली. आमच्याखोरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहात होतो.
19 एका रात्री ही बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मेले.
20 तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वत:कडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले.
21 दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.”
22 पण तेवढ्यात ती दुसरी बाई म्हणाली, “नाही, जिवंत मूलच आहे, मेलेले बाळ तुझे आहे.”पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मेले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्राकरे दोघींचाही राजासमोर कडाक्याचा वाद झाला.
23 तेव्हा राजा शलमोन म्हणाला, “जिवंत मूल आपले आणि मेलेले बाळ दुसरीचे असे तुम्ही दोघीही म्हणता.”
24 राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले.
25 राजा शलमोन म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करुन त्याचे दोन तुकडे करु आणि दोघींना एक एक देऊ.”
26 दुसरी बाई म्हणाली, “फार छान! बाळाचे दोन तुकडे करा. म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही.”पण पहिल्या बाईला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.”
27 तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्याला पहिल्या बाईच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.
28 राजाचा हा निवाडा इस्राएलच्या लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना आदर वाटला. योग्य निर्णय घेण्याचे उच्च कोटीचे परमेश्वरी शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.”

1-Kings 3:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×