Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

1 Kings Chapters

1 Kings 22 Verses

Bible Versions

Books

1 Kings Chapters

1 Kings 22 Verses

1 पुढील दोन वर्षे इस्राएल आणि अराम यांच्यामध्ये शांततेची गेली.
2 तिसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलचा राजा अहाब याला भेटायला गेला.
3 यावेळी अहाबने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामच्या राजाने गिलाद मधील रामोथ आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.”
4 आणि अहाब राजा यहोशाफाटला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथला अरामी सैन्याशी लढाल का?”यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत.
5 पण प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.”
6 तेव्हा अहाबने संदष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. अहाबने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ येथे अरामी फौजेवर चालून जावे का? की काही काळ थांबावे?”संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हाला जय मिळवून देईल.”
7 पण यहोशाफाटने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”
8 राजा अहाब म्हणाला, “तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा मुलगा मीखाया. पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते.”यहोशाफाट म्हणाला, “अहाब राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”
9 तेव्हा अहाब राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.
10 यावेळी दोन्ही राजे राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते.शोमरोनच्या वेशीजवळ न्यायदान चालते त्या ठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्यकथन चालेले होते.
11 त्यांच्यापैकी एक कनानाचा मुलगा सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबला म्हणाला, “‘परमेश्वराचे म्हणणे, ‘ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस’ असे देवाचे म्हणणे आहे. म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.”
12 सिद्कीयाचे हे म्हणणे इतर सर्वच संदेष्ट्यांना पटले. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”
13 हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला. त्याला भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”
14 पण मीखाया म्हणाला, “नाही, कादापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगीन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”
15 मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्याला विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथला अरामच्या सैन्यावर आता चढाई करु का?”मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”
16 पण अहाब त्याला म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काम ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. कितीदा मी तुला तेच सांगू?”
17 तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
18 मग अहाब यहोशाफाटला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.”
19 इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. त्याचे दूत त्याच्या शेजारी उभे आहेत.
20 देव म्हणाला, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथला अरामवर हल्ला करावा असे मला वाटते. त्यात त्याला मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना.
21 मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’
22 परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू अहाबची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले जा आणि अहाब राजाला या मोहात पाड तुला यश येईन.”‘
23 मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, “तेव्हा खरी हकीकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरालाच वाटते.”
24 मग सिद्कीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाला त्याने एक थापड मारली. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”
25 मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”
26 तेव्हा अहाब राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
27 मीखायाला तुरुंगात घालायला त्यांना सांगा. त्याला फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत येईपर्यंत त्याला तिथेच राहू द्या.”
28 मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वरमाझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”
29 नंतर राजा अहाब आणि राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामच्या सैन्याशी लढायला गेले. गिलाद प्रांतात हे युध्द झाले.
30 अहाब यहोशाफाटला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करुन युध्दाला सुरुवात केली.
31 अरामच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले.
32 तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटला पाहिले. तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले. त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला.
33 हा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मारले नाही.
34 तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नेमका इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हाता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दुर जाऊ.”
35 युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामच्या सैन्याकडे पाहात होता. त्याला एवढा रक्तरत्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला.
36 सूर्यास्ताच्या वेळी इस्राएलच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.
37 राजा अहाबला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनला आणला. त्याला त्यांनी तिथे पुरले.
38 शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबचा रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नेमके घडले.
39 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे.
40 अहाब मरण पावला व त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
41 अहाब इस्राएलचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाटहा आसाचा मुलगा.
42 यहोशाफाट वयाच्या पस्तिसाव्या वर्षी राजा झाला आणि यरुशलेममध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची मुलगी.
43 यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपल्या वडीलांप्रमाणेच होता. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्या ठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.
44 इस्राएलच्या राजाशी त्याने शांततेचा करार केला.
45 राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकीकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे.
46 धर्माच्या नावाखाली देह विक्रय करणाऱ्या स्त्रीपुरुषांना यहोशाफाटने प्रार्थनास्थळांमधून हाकलून लावले. यहोशाफाटचे वडील आसा राज्या करीत असताना हे लोक त्या ठिकाणी होते.
47 याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहात असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.
48 राजा यहोशाफाटने काही मालवाहू गलबते बांधली. त्यात त्याचा हेतू ओफीरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.
49 इस्राएलचा राजा अहज्या याने यहोशाफाटला मदतीचा हात दिला. त्याच्या माणसांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली. पण अहज्याची कुमक स्वीकारण्यास यहोशाफाटने नकार दिला.
50 यहोशाफाट मरण पावला त्या नंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोराम राज्य करु लागला.
51 अहज्या अहाबचा मुलगा होता. यहोशाफाटच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.
52 अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडील अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा मुलगा यरोबाम या सगळ्यांनी केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांना आणखी पापात लोटले.
53 आपल्या वडीलांप्रमाणेच अहज्यानेही बाल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबवर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला.

1-Kings 22:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×