ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता माणसांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो. कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. आत्म्याच्या द्वारे तो गुढ गोष्टी बोलतो.
ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वत:चीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करुन घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे (देवासाठी बोलण्याचे) दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.
आता तुम्ही सर्वांनी भाषांमध्ये बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याहीपेक्षा जर तुम्हांला संदेश देता आले तर मला अधिक आवडेल. जो संदेश देतो, (देवासाठी बोलतो) तो भाषा बोलणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण भाषा बोलणारा हा संदेश देणाऱ्यासारखाच (देवासाठी बोलणान्यासारखाच) आहे, जर त्याने जी भाषा तो बोलतो तिचा अर्थ सांगितला तर, त्याद्वारे संपूर्ण मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या बळकट होते.
आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का?
हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे: जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल?
नेमके तेच तुम्हांलाही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवीत म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यत्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा.
कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो फक्त ऐकणारा सामान्य तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही.
म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल (आणि) जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हाला म्हणणार नाही का?
परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात;
बंधूनो, मग काय करावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, प्रत्येकाकडे गाण्यासाठी स्तोत्र असते कोणाकडे शिक्षण असते. कोणाकडे प्रकटीकरण असते. कोणी दुसऱ्या भाषेत बोलतो, कोणी त्या भाषेचा अर्थ सांगतो, प्रत्येक गोष्ट मंडळीच्या वाढीसाठी केली गेली पाहिजे.
जर कोणी दुसऱ्या भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एका वेळी एकानेच बोलावे, आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा.
एखादा जर स्वत:ला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो धार्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हाला लिहित आहे ती देवाकडून देण्यात आलेली आज्ञा आहे.