Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Numbers Chapters

Numbers 14 Verses

Bible Versions

Books

Numbers Chapters

Numbers 14 Verses

1 त्या रात्री छावणीतले सगळे लोक जोरजोरात आक्रोश करायला लागले.
2 इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रारी केल्या. सगळे लोक एकत्र आले आणि मोशेला व अहरोनाला म्हणाले, “आम्ही मिसरमध्ये किंवा वाळवंटात मरुन जायला हवे होते. या नवीन प्रदेशात मारले जाण्यापेक्षा ते अधिक चांगले झाले असते.
3 या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला इथे आणले का? शत्रू आम्हाला मारून टाकील आणि आमच्या बायका मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
4 नंतर लोक एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
5 तिथे जमलेल्या सर्व लोकांसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
6 यहोशवा आणि कालेब यांनी आपले कपडे फाडले (तक्रारी ऐकून झालेल्या दु:खप्रदर्शनासाठी) नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे ही या प्रदेशाच्या शोधात गेलेल्या लोकांपैकी होते.
7 या दोघांनी तिथे जमलेल्या इस्राएल लोकांना सांगितले, “आम्ही जो प्रदेश बघितला तो खूप चांगला आहे.
8 तो प्रदेश चांगल्या चांगल्या गोष्टींनी संपन्न आहे. आणि जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या प्रदेशात नेईल आणि तो प्रदेश आपल्याला देईल.
9 म्हणून परमेश्वराविरुद्ध जाऊ नका. त्या प्रदेशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपण त्यांचा पराभव करु शकू. त्यांच्याकडे कसलेही संरक्षण नाही. सुरक्षित राहण्यासाठी काहीही नाही. परंतु आपल्याजवळ परमेश्वर आहे. म्हणून घाबरु नका.”
10 सर्व लोक यहोशवाला आणि कालेबला दगडांनी ठार मारण्याची भाषा बोलू लागले. परंतु परमेश्वराची प्रभा दर्शन मंडपावर दिसू लागली. तेथून ती सर्व लोकांना दिसली.
11 परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक किती वेळ माझ्याविरुद्ध जाणार आहेत? त्यांचा माझ्यावर विश्वास नाही असे ते दाखवितात ते माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला नकार देतात. मी त्यांना खूप शक्तिशाली चिन्हे दाखवली तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी त्यांच्या मध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत.
12 मी त्यांना एखाद्या भयानक आजारने मारून टाकीन. मी त्यांचा नाश करीन. मी तुझा उपयोग करुन दुसरे राष्ट्र निर्माण करीन. तुझा देश या लोकांपेक्षा मोठा आणि शक्तिमान असेल.”
13 नंतर मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू असे केलेस तर ते मिसर मधील लोक ऐकतील तुझ्या लोकांना मिसरमधून बाहेर आणण्यासाठी तू तुझ्या महान शक्तीचा उपयोग केलास हे त्यांना माहीत आहे.
14 मिसरमधल्या लोकांनी कनानच्या लोकांना हे सांगितले आहे. तू परमेश्वर आहेस हे त्यांना अगोदरच माहीत झालेले आहे. तू आपल्या लोकांबरोबर असतोस हे त्यांना माहीत झाले आहे. लोकांनी तुला पाहिले हे त्यांना माहीत आहे. लोकांना खास ढगाविषयी माहिती आहे. तुझ्या लोकांना मार्ग दाखविण्यासाठी तू त्या ढगाचा उपयोग करतोस हे त्या लोकांना माहीत आहे. रात्री त्या ढगाचा अग्नी होतो आणि तुझ्या लोकांना मार्ग दाखवतो हे ही त्यांना माहीत आहे.
15 म्हणून आता तू या लोकांना मारू नकोस. जर तू त्यांना मारलेस तर सर्व देशांना ही बातमी कळेल व ते म्हणतील.
16 “परमेश्वर त्या लोकांना त्याने वचन दिलेल्या प्रदेशात आणू शकत नव्हता म्हणून परमेश्वराने त्यांना वाळवंटात मारून टाकले.’
17 “प्रभू, म्हणून आता तू तुझी शक्ती दाखव. तू, ‘मी ती दाखवीन’ असे म्हणाला होतास त्याप्रमाणे दाखव.
18 तू म्हणालास, ‘परमेश्वराला रागवायला वेळ लागतो. तो महान प्रीतिने भरलेला आहे. परमेश्वर अपराधांची व अधर्माची क्षमा करतोपण जे लोक अपराधी आहेत त्यांना परमेश्वर नेहमी शिक्षा करतो. त्यांच्या मुलांना व नातवंडांना शिक्षा करतो आणि पंतवंडाना देखील त्या वाईट गोष्टीबद्दल शिक्षा करतो.’
19 आता तुझे दिव्य प्रेम या लोकांना दाखव. त्यांच्या पापाची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही क्षमा कर.”
20 परमेश्वराने उत्तर दिले, “तू सांगितलेस त्याप्रमाणे मी लोकांना क्षमा करीन.”
21 पण मी तुला सत्य सांगतो. मी नक्कीच जिवंत आहे आणि माझी प्रभा नक्कीच साऱ्या पृथ्वीवर भरून आहे. हे जसे खरे आहे तसेच खरेपणाने मी तुला वचन देतो.
22 मी मिसर देशातून ज्या लोकांना बाहेर काढले त्यांच्यापैकी कोणीही कनान देश कधीही बघणार नाही. त्या लोकांनी मिसर देशात माझा पराक्रम आणि मी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या. आणि वाळवंटात ज्या महान गोष्टी मी केल्या त्याही त्यांनी बघितल्या. परंतु त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही आणि माझी दहादा परीक्षा पाहिली.
23 मी त्यांच्या पूर्वजांना वचन दिले. मी त्यांना तो प्रदेश देण्याचे वचन दिले. पण त्यांच्यापैकी जे लोक माझ्याविरुद्ध गेले ते कधीही त्या प्रदेशात पाऊल टाकणार नाहीत.
24 पण माझा सेवक कालेब वेगळा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून मी त्याला त्याने आधी पाहिलेल्या प्रदेशात घेऊन जाईन. आणि त्याच्या वंशजांना तो प्रदेश मिळेल.
25 अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात रहात आहेत. म्हणून उद्या तुम्ही ही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या वाळवंटात परत जा.”
26 परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला,
27 “हे वाईट लोक किती काळ माझ्याविरुद्ध तक्रार करीत राहणार आहेत? मी त्यांच्या तक्रारी आणि कुरकुरी ऐकलेल्या आहेत.
28 म्हणून तू त्यांना सांग, ‘ज्याविषयी तुम्ही तक्रार करत. त्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला करील. तुम्हाला पुढील गोष्टी होतील.
29 तुम्ही या वाळवंटात मराल. वीस वर्षांचा किंवा त्याहून मोठा असलेला आणि माझ्या लोकापैकी असलेला प्रत्येक जण मरेल. तुम्ही माझ्याविरुद्ध, परमेश्वराविरुद्ध तक्रार केली आहे.
30 म्हणून जो प्रदेश देण्याचे वचन मी तुम्हाला दिले त्या प्रदेशात तुमच्यापैकी कोणीही प्रवेश करणार नाही आणि कोणीही राहाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा त्या प्रदेशात जातील.
31 त्या प्रदेशातील लोक तुमची मुले नेतील अशी भीती तुम्हाला वाटली आणि त्याविरुद्ध तुम्ही तक्रार केली. पण मी तुम्हाला सांगतो की मी ती मुले त्या प्रदेशात आणीन. तुम्ही ज्या गोष्टींचा स्वीकार करायला नकार दिला त्या गोष्टींचा ते उपभोग घेतील.
32 आणि तुमच्याबद्दल बोलायचे तर तुम्ही या वाळवंटात मराल.
33 “तुमची मुले इथे या वाळवंटात 40 वर्षे भटकणारे मेंढपाळ असतील. त्यांना दु:ख भोगावे लागेल कारण तुम्ही माझ्याशी इमानदार नव्हता. या वाळवंटात जोपर्यंत तुम्ही मरणार नाही तोपर्यंत त्यांना दु:ख भोगावे लागेल.
34 तुम्हाला तुमच्या पापाबद्दल 40 वर्षे दु:ख भोगावे लागेल. (त्या माणसांना तो प्रदेश शोधायला 40 दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष) मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हाला समजेल.
35 “मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट माणसांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरुद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या वाळवंटात मरतील.”
36 मोशेने ज्या लोकांना नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तिवान नाहीत.
37 इस्राएल लोकांमध्ये संकटे पसरविण्यास तेच लोक जबाबदार होते म्हणून परमेश्वराने त्या लोकांना मारण्यासाठी आजार निर्माण केला.
38 यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो प्रदेश शोधायला पाठवलेल्या लोकांत होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. ज्या आजाराने इतर सर्वजण मेले, तो आजार त्या दोघांना झाला नाही.
39 मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांना सांगितल्या. लोक खूप दु:खी झाले.
40 दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या प्रदेशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हाला वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या प्रदेशात आम्ही जाऊ.”
41 पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हाला यश मिळणार नाही.
42 त्या प्रदेशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.
43 अमालेकी आणि कनानी लोक तेथे तुमच्याविरुद्ध लढतील. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”
44 परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही.
45 डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

Numbers 14:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×