माझ्या विश्वासू सहकाऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो की, ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर सुवार्तेच्या प्रसारासाठी कष्ट घेतले आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत त्यांना कृपा करुन मदत करा.
शेवटी, बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सदगुण आहे, आणि जर काही स्तुति आहे, या गोष्टींनी तुमची मने भरुन टाका.
जे काही तुम्ही शिकला आहात, जे तुम्हांला मिळाले आहे व जे माझ्याकडून ऐकले आहे आणि जे मी करताना तुम्ही पाहिले आहे, त्या गोष्टी करीत राहा. आणि देव जो शांतीचा उगम आहे तो तुमच्याबरोबर राहील.
मी प्रभूमध्ये खूपच आनंदित झालो कारण शेवटी तुमची माझ्याबद्दलची काळजी जागृत झाली. अर्थात तुम्ही नेहमीच माझी काळजी घेतली. परंतु ती दाखविण्याची संधी तुम्हांला मिळाली नाही.
गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो. कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपूरेपणात राहाण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे.
तुम्हा फिलिप्पैकरांना माहीत आहे की, सुवार्ता सांगण्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी मासेदोनिया सोडले, तेव्हा तुमच्याशिवाय कोणत्याही मंडळीने माझ्याशी देवाणघेवाण केली नाही.
माझ्या गरजेपुरते माझ्याजवळ सर्व काही आहे आणि ते विपुल आहे. एपफ्रदीताच्या करवी ज्या गोष्टी तुम्ही पाठविल्या त्या मिळाल्यामुळे गरजेपेक्षा अधिक माझ्याजवळ आहे. ते मधुर सुगंधी अर्पण स्वीकारण्यास योग्य असा यज्ञ जो देवाला संतोष देणार असा आहे.