Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Nehemiah Chapters

Nehemiah 9 Verses

Bible Versions

Books

Nehemiah Chapters

Nehemiah 9 Verses

1 त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी एकत्र जमले. आपल्याला शोक झाला आहे हे सूचित करणारे कपडे त्यांनी घातले होते. तसेच आपली विमनस्कता दाखवण्यासाठी त्यांनी केसात राख घालून घेतली होती.
2 मूळ इस्राएली लोक परकी लोकांमध्ये न मिसळता वेगळा गट करून उभे होते. इस्राएलींनी मंदिरात उभे राहून आपल्या तसेच आपल्या पूर्वजांच्या पापांची कबुली दिली.
3 तीन तास तिथे उभे राहून त्यांनी परमेश्वर देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथाचे वाचन केले. पुढे आणखी तीन तास त्यांनी आपल्या पातकांचे कबुलीजबाब दिले आणि खाली वाकून परमेश्वराची उपासना केली.
4 मग लेवी जिन्यावर उभे राहिले. या लेवींची नावे पुढीलप्रमाणे: येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या बानी, आणि कनानी. त्यांनी खूप मोठयाने परमेश्वर देवाचा धावा केला.
5 मग पुढील हे लेवी पुन्हा बोलले: येशुवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथहग्र. ते म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन करा.”देवाचे अस्तित्व पहिल्यापासून आहे आणि परमेश्वर चिरकाल राहील. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत. तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो.
6 तू देव आहेस, परमेश्वरा, तूच फक्त देव आहेस. आकाश तू निर्माण केलेस. स्वर्ग आणि त्यातील सगळे काही तू केलेस. ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही तू निर्माण केलेले आहेस. सर्व समुद्र आणि त्यांच्यातील सगळयाचा तूच निर्माता आहेस! तू सगळयात जीव ओतलेस. स्वर्गातील देवदूत तुला वाकून अभिवादन करतात व तुझी उपासना करतात.
7 हे परमेश्वरा, तूच देव आहेस. तू अब्रामाची निवड केलीस. बाबेलमधील (खास्द्यातील) ऊर नगरातून त्याला तू बाहेर काढून त्याला अब्राहाम असे नाव दिलेस.
8 तो तुझ्याशी प्रामाणिक आणि निष्ठावान आहे असे पाहून त्याच्याशी तू करार केलास. कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी आणि गिर्गाशी यांचा देश त्याला द्यायचे वचन दिलेस. अब्राहामाच्या वंशजांना हा भूभाग द्यायचे तू वचन दिलेस आणि तू ते पाळलेस. कारण, तू भला आहेस.
9 मिसरमधील आमच्या पूर्वजांच्या यातना तू पाहिल्यास. आणि त्यांनी तांबड्या समुद्राजवळ मदतीसाठी केलेला धावा तू ऐकलास.
10 फारोला तू चमत्कार दाखवलेस. त्याचे अधिकारी आणि त्याची प्रजा यांच्यासाठी आश्चर्यकारक कृत्ये केलीस. आमच्या त्या पूर्वजांपेक्षा आपण चांगले आहोत असे मिसरचे लोक समजत होते, हे तू जाणून होतास. पण तुझी थोरवी तू सिध्द करून दाखवलीस. अजूनही त्यांना त्या गोष्टीचे स्मरण आहे.
11 त्यांच्या डोळयादेखत तू तांबडा समुद्र दुभंगून दाखवलास. आणि ते कोरड्या जमिनीरुन चालत गेले. मिसरचे सैन्य त्यांचा पाठलाग करत होते पण तू त्या शत्रूला समुद्रात फेकून दिलेस आणि ते समुद्रात दगड बुडावा तसे बुडुन गेले.
12 दिवसा तू त्यांना (आमच्या पूर्वजांना) मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस आणि रात्री तू अग्निस्तंभ वापरलास. अशा प्रकारे त्यांचा मार्ग प्रकाशमान करत तू त्यांना वाट दाखवलीस.
13 मग तू सीनाय पर्वतावर उतरलास, त्यांच्याशी आकाशातून बोललास, तू त्यांना चांगले नियम घालून दिलेस, त्यांना खरी शिकवण दिलीस. चांगले नियम आणि आज्ञा तू त्यांना दिल्यास.
14 शब्बाथ या तुझ्या विश्रांतीच्या खास दिवसाचा त्यांना परिचय करून दिलास. तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम आणि धर्मशास्त्र दिलेस.
15 ते भुकेले होते म्हणून तू त्यांना आकाशातून अन्न दिलेस. ते तहानलेले होते, म्हणून त्यांना खडकातून पाणी दिलेस. आणि तू त्यांना म्हणालास, “या, ही जमीन घ्या, आपल्या शक्तिसामर्थ्याने त्यांच्यासाठी तू जमीन संपादन केलीस.
16 पण आमचे पूर्वज अन्मत्त झाले. अहंमन्य बनले, आणि त्यांनी तुझ्या आज्ञांचे पालन करायचे नाकारले.
17 ते ऐकेनात तू जी आश्चर्यकारक कृत्ये त्यांच्यासमोर केलीस ती ते विसरले. ते हट्टी झाले. त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी मिसरला परत जायचे ठरवले आणि पुन्हा गुलाम होण्यासाठी. पण तू क्षमाशील देव आहेस. तू दयाळू आणि कृपाळू आहेस. तू सहनशील व प्रेमळ आहेस म्हणून तू त्यांना सोडले नाहीस.
18 त्यांनी सोन्याच्या वासारांच्या मूर्ती केल्या आणि “आम्हाला मिसर मधून सोडवणारे हेच ते देव’ असे ते म्हणाले. तरी तू त्यांचा त्याग केला नाहीस.
19 तू कृपावंत आहेस. म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस. दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ काढून घेतला नाहीस. तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास. रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्निस्तंभ काढून टाकला नाहीस त्यांच्या पुढचा मार्ग उजळत तू त्यांना वाट दाखवत राहिलास.
20 त्यांना शहाणपण येण्यासाठी तू त्यांना आपला सदात्मा दिलास. अन्न म्हणून त्यांना मान्ना दिलास. त्यांना तहान लागलेली असताना त्यांना पाणी दिलेस.
21 चाळीस वर्षे तू त्यांची काळजी वाहिलीस. वाळवंटात त्यांच्या सर्व गरजा भागल्या. त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत त्यांच्या पावलांना सूज आली नाही की दुखापत झाली नाही.
22 हे परमेश्वरा, त्यांना तू राज्ये आणि राष्टे दिलीस. फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस. हेशबोनच्या राजाचा म्हणजे सिहोनचा प्रांत त्यांना मिळाला. बाशानचा राजा ओग याचा भूभाग त्यांना मिळाला.
23 त्यांच्या वंशजांची संख्या तू आकाशातील तारकाप्रमाणे विपुल केलीस. त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशापर्यंत त्यांना तू नेऊन पोचवलेस. त्यांनी पुढे जाऊन तो प्रदेश ताब्यात घेतला.
24 या वंशजांनी तो प्रदेश घेतला. तेथे राहणाऱ्या कनान्यांचा त्यांनी पराभव केला. तूच त्यांच्या हातून हा पराभव करवलास. हे देश, तिथले लोक आणि राजे यांच्याशी तू त्यांना मन मानेल तसे वागू दिलेस
25 त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला. सुपीक प्रदेश त्यांनी मिळवला, उत्तम वस्तूनी भरलेली घरे त्यांना मिळाली खोदलेल्या विहिरी त्यांना आयत्या मिळाल्या. द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे त्यांना मिळाली, खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले. तू त्यांना दिलेल्या मनोहारी गोष्टीचा त्यांनी उपभोग घेतला.
26 आणि मग ते तुझ्यावर उलटले. तुझ्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला, त्यांनी तुझ्या संदेष्ठ्यांचा वध केला. या संदेष्ट्यांनी लोकांना सावध केले होते. त्यांना ते परत तुझ्या मार्गावर आणू पाहात होते. पण आमच्या पूर्वजांनी मात्र तुझ्याविरुद्ध भयंकर दुराचरण केले.
27 म्हणून तू त्यांना शत्रूच्या ताब्यात जाऊ दिलेस. शत्रूने त्यांना फार हैराण केले. अडचणीत सापडल्यावर आमच्या पूर्वजांनी मदतीसाठी तुला आवाहन केले आणि स्वर्गातून तू त्यांचा धावा ऐकलास. तू फार कनवाळू आहेस. म्हणून त्यांच्या रक्षणार्थ तू लोकांना पाठवलेस. आणि या लोकांनी त्यांची शत्रू पासून सुटका केली.
28 मग निवांतपणा लाभल्यावर आमच्या पूर्वजांनी पुन्हा ती दुष्कृत्ये करायला सुरुवात केली. तेव्हा तू शत्रू कडून त्यांचा पाडाव करवलास आणि शासन करवलेस. त्यांनी मदतीसाठी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकलास आणि त्यांच्या मदतीला गेलास किती बरे तू कनवाळू आहेस! असे अनेकदा घडले.
29 तू त्यांना बजावलेस. तू त्यांना तुझ्या शिकवणीकडे परतायला सांगितलेस. पण ते फार अहंमन्य झाले होते. तुझ्या आज्ञा ऐकायचे त्यांनी नाकारले. तुझ्या नियमाप्रमाणे आचरण करणारा खरेखुरे जीवन जगतो. पण आमच्या पूर्वजांनी तुझ्या नियमाचा भंग केला. ते दुराग्रही झाले होते. त्यांनी तुझ्याकडे पाठ फिरवली त्यांनी तुझे ऐकायचे नाकारले.
30 आमच्या पूर्वजांच्या बाबतीत तू खूप सहनशीलता दाखवलीस. अनेक वर्षे तू त्यांना गैरवर्तन करु दिलेस. आपल्या आत्म्याने तू त्यांना बजावलेस. त्यांना समज द्यायला संदेष्टे पाठवलेस पण आमच्या पूर्वजांनी ऐकले नाही. तेव्हा त्यांना तू इतर देशातल्या लोकांच्या हवाली केलेस.
31 पण तू किती दयाळू आहेस. तू त्यांचा समूळ संहार केला नाहीस. त्यांचा तू त्याग केला नाहीस. देवा, तू किती कृपाळू आणि दयाळू आहेस.
32 हे देवा, तू महान देव आहेस. दरारा उत्पन्न करणारा आणि पराक्रमी योध्दा आहेस तू निष्ठा बाळगणारा आहेस. तू करार पाळतोस आमच्यावर अनेक आपत्ती आल्या आणि आमच्या अडचर्णीना तू महत्व देतोस आम्ही सर्वजण, आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या.
33 पण देवा, आमच्या बाबतीत जे घडले त्या सगळया गोष्टींच्या बाबतीत तुझे खरे होते. तुझे बरोबर होते आणि आम्ही चुकत होतो
34 आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही. तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या खबरदारीच्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले.
35 स्वत:च्या राज्यात राहात असताना देखील आमच्या पूर्वजांनी तुझी सेवा केली नाही. त्यांनी दुष्कृत्ये करायचे थांबवले नाही. तू त्यांना बहाल केलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींचा त्यांनी उपभोग घेतला. सुपीक जमीन आणि विशाल प्रदेश याचा त्यांनी उपभोग घेतला. पण तरीही स्वत:च्या वाईट कृत्यांना त्यांनी आळा घातला नाही.
36 आणि आता आम्ही गुलाम झालो आहोत. या भूमीत, आमच्या पूर्वजांनी इथली फळे चाखावी आणि इथे पिकणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा म्हणून तू त्यांना दिलेल्या या भूमीत आम्ही गुलाम आहोत.
37 या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले, त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते. या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे. ते मन मानेल तसे वागतात. आम्ही मोठ्या संकटात आहोत.
38 या सगळया गोष्टींमुळे आम्ही करार करत आहोत. तो बदलता येणार नाही. तो आम्ही लेखी करत आहोत. आमचे अधिकारी, लेवी, याजक हे या करारावर स्वाक्षऱ्या करून त्यावर शिक्कामोर्तब करत आहेत.

Nehemiah 9:19 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×