Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Leviticus Chapters

Leviticus 26 Verses

Bible Versions

Books

Leviticus Chapters

Leviticus 26 Verses

1 “तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका; तसेच कोरीव मूर्ती किंवा स्मारक स्तंभ आठवणींचा बुरुज-उभारु नका अथवा पूजा करण्यासाठी आपल्या देशात, कोरीव पाषाण स्थापन करु नका; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!
2 “तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसांची पवित्र शब्बाथांची-आठवण ठेवून ते पाळावे आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
3 “तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या!
4 तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.
5 तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत राहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत राहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल.
6 मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हाला कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करुन येणार नाही.
7 “तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल.
8 तुमच्यातील पांच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
9 “मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हाला भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;
10 तुम्हाला मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हाला नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल! म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
11 आणखी मी तुम्हामध्ये माझा पवित्र मंडप टाकून वस्ती करीन; तुम्हापासून मी जाणार नाही!
12 मी तुमच्याबरोबर चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल.
13 मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हाला पुन्हा ताठ चालवले आहे!
14 “परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर मग ह्या वाईट गोष्टी तुम्हावर येतील.
15 तुम्ही जर माझे नियम मानण्यास व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मग तुम्ही माझा करार मोडाल.
16 तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हाला पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हाला यश मिळणार नाही-तुम्हाला पीक मिळणार नाही-आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.
17 मी तुमच्याविरुद्ध होईन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
18 “ह्या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करीन.
19 मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.
20 तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीकदेणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
21 “तरी सुध्दा अद्याप तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हाला तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक ताडण करीन! तुम्ही जेवढी अधिक पापे कराल तेवढी अधिक शिक्षा पावाल!
22 मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना तुमच्यापासून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; ते तुमच्या अनेक लोकांना मारुन टाकतील, व त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील!
23 “एवढे करुनही तुम्हाला अद्दल घडली नाही आणि तुम्ही माझ्याविरुद्धच वागलात,
24 तर मीही तुमच्याविरुद्ध होईन आणि मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट ताडण करीन.
25 तुम्ही माझा करार मोडला म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन; तुमच्यावर सैन्ये चालून येतील असे मी करीन; सुरक्षिततेसाठी तुम्ही तुमच्या नगरात जाल पण तेव्हा मी तुमच्यावर मरीचा रोग पसरवीन; तुमचे शत्रु तुमचा पराभव करतील.
26 मी तुम्हाला धान्याचा फार थोडा वाटा देईन; तेव्हा दहा स्त्रीया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हाला तोलून देतील; ती तुम्ही खाल तुमचे पोट भरणार नाही-तुम्ही भुकेलेच राहाल!
27 “एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरुद्ध वागला,
28 तर मात्र खरोखर मी माझा राग तुम्हाला दाखवीन! मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करीन!
29 तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची तुम्हावर पाळी येईल.
30 तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
31 मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक अर्पणांचा वास घेणे मी बंद करीन.
32 मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहाण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील.
33 परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमचा नायनाट करीन; तुमचा देश ओसाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.
34 “तुम्हाला तुमच्या शत्रूच्या देशात नेतील; तुमचा देश ओसाड होईल. तेव्हा अखेरीस तुमच्या देशाला विसावा मिळेल. तो शब्बाथाचा विसावा उपभोगील.
35 देश ओसाड असे पर्यंत तुम्ही राहात असताना तुमच्या शब्बाथांनी त्याला दिला नाही इतका विसावा त्याला मिळेल.
36 तुमच्यातील जे जगूनवाचूंन उरतील त्यांचे धैर्य आपल्या शत्रूंच्या देशात खचेल; त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटेल; वाऱ्याने उडविल्या जाणाऱ्या पानाप्रमाणे ते इकडे तिकडे संभोवार पळतील; कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसतानाही ते पळतील.
37 कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील व कोणी त्यांच्यामागे लागले नसतानाही पळाल्यामुळे ते अडखळून एकमेंकावर पडतील.“तुमच्या शत्रूविरुद्ध उभे ठाकण्याइतके बळ तुमच्यात नसणार.
38 राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल.
39 तेव्हा जगूनवाचून उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील ज्याप्रमाणे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.
40 “परंतु कदाचित् ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे कबूल करतील. ते माझ्याविरुद्ध गेले हेही ते कदाचित् कबूल करतील. त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले हेही ते कदाचित् मान्य करतील.
41 मी, त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध-बेसुनत-हृदय लीन होऊन ते आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील.
42 तेव्हा मग मी याकोब, इसहाक व अब्राहाम ह्यांच्याशी केलेल्या कराराची आठवण करीन व त्या देशाचीही आठवण करीन.
43 “त्यांचा देश त्यांच्यावाचून ओस पडेल आणि ओस असे पर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; मग जगूनवाचून राहिलेले आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील; त्यांनी माझ्या नियमांना व विधींना तुच्छ लेखून ते पाळले नाहीत म्हणून त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांना शिक्षा झाली हे त्यांना समजेल.
44 त्यांनी खरोखर पाप केले; पण त्यांच्यापासून मी आपले तोंड फिरवणार नाही; ते आपल्या शत्रूंच्या देशात असले तरी मी त्यांचे ऐकेन. मी त्यांना समूळ नष्ट करणार नाही. त्यांच्याशी केलेला करार मी मोडणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे!
45 त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!”
46 हे विधी, नियम व निर्बध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांना सांगितले.

Leviticus 26:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×