पण त्या सैन्यांनाही ते स्वप्नासारखेच वाटेल. त्यांना पाहिजे असलेले मिळणार नाही. उपाशी माणसाला अन्नाबद्दलचे स्वप्न पाहावे तसेच ते असेल. तो जागा झाला तरी त्याची तहान भागलेली नसते.सियोनविरूध्द लढणाऱ्या राष्ट्रांची अशीच स्थिती आहे. त्या राष्ट्रांना जे हवे आहे ते मिळणार नाही.
हे असे घडेल असे मी तुम्हाला सांगतो पण तुम्हाला माझे म्हणणे कळणार नाही. माझे शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाप्रमाणे आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्याला वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे. मी ते उघडू शकत नाही.”
माझा प्रभू म्हणतो, “हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व माणसांनी घालून दिलेले नियम आहेत.
ते लोक परमेश्वरापासून काही लपविण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांची दुष्कृत्ये अंधारात करतात. ते लोक स्वत:शीच म्हणतात, “आम्हांला कोणीही पाहू शकत नाही. आम्ही कोण आहोत हे कोणालाही माहीत नाही.”
तुम्ही गोंधळलेले आहात. तुम्हाला वाटते की चिखल व कुंभार सारखेच. तुम्हाला वाटते की एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला सांगेल, “तू मला घडवले नाहीस.” असे म्हणणे म्हणजे मातीच्या भांड्याने कुंभाराला “तुला काही समजत नाही” असे सांगण्यासारखेच होय.
म्हणून परमेश्वर याकोबच्या वंशजांशी बोलतो. (ह्याच परमेश्वराने अब्राहामला मुक्त केले होते.) परमेश्वर म्हणतो, “याकोब, (इस्राएलमधील लोकांनो,) आता तुम्हाला ओशाळवाणे व लज्जित व्हावे लागणार नाही.
तो त्याची सर्व मुले पाहील आणि तो माझ्या नावाला पवित्र म्हणेल. मी ह्या मुलांना स्वत:च्या हाताने घडविले आहे आणि ही मुले म्हणतील की याकोबाचा पवित्र देव हा असामान्य आहे. ही मुले इस्राएलाच्या देवाचा आदर करतील.