Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

1 Samuel Chapters

1 Samuel 20 Verses

Bible Versions

Books

1 Samuel Chapters

1 Samuel 20 Verses

1 दावीद रामा येथील शिबिरापासून दूर पळून गेला. योनाथानकडे येऊन तो म्हणाला, “माझं काय चुकल? माझा अपराध तरी काय? तुझे वडील का माझ्या जिवावर उठले आहेत?”
2 योनाथान म्हणाला, “हे काय भलतेच? ते कशाला तुझ्या जिवावर उठतील? मला सांगितल्या शिवाय ते कधीच कुठली गोष्ट करत नाहीत. कोणतीही महत्वाची किंवा क्षुल्लक गोष्ट असो, ते ती मला सांगतातच. मग तुझा वध करायची बाब ते कशी माझ्यापासून लपवून ठेवतील? तेव्हा हे काही खरं नव्हे!”
3 तेव्हा दावीद म्हणाला, “आपण मित्र आहोत ही गोष्ट तुझे वडील चांगली जाणून आहेत. ते स्वत:शी म्हणाले, “योनाथानला हे कळता कामा नये. त्याला कळले तर तो हे दावीदला सांगेल.” पण परमेश्वराची आणि तुझ्या जीविताची शपथ घेवून सांगतो, मृत्यू माझ्याभोवती घोटाळतो आहे.”
4 योनाथान मग दावीदला म्हणाला, “तू काय म्हणशील ते करायला मी तयार आहे.
5 मग दावीद म्हणाला, “उद्या अमावस्ये निमित्त मेजवानी आहे. तेव्हा राजाच्या पंक्तीला मी असायला हवे. पण संध्याकाळपर्यंत मी शेतात लपून बसतो
6 मी नसल्याचे तुझ्या वडीलांच्या लक्षात आले तर त्यांना सांग, ‘दावीदला बेथलहेमला तातडीने जायचे होते. त्याच्या सगळ्या कुटुंबाचा मासिक यज्ञ तेथे आहे. त्यात हजर राहायला जाण्यासाठी त्याने माझी परवानगी मागितली.’
7 तुझ्या वडीलांनी हे सहजगत्या मान्य केले तर मला काही धोका नाही. पण ते संतापले तर मात्र माझ्या जिवाला धोका आहे हे तू ओळख.
8 योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या वडीलांकडे नेऊ नको.”
9 यावर योनाथान म्हणाला, “अस घडणार नाही. ते तुझ्या वाईटावर आहेत असं माझ्या लक्षात आलं तर मी तूला तसं सांगीन.”
10 दावीद म्हणाला, “तुझ्याशी ते कठोरपणे वागले तर मला कोण खबर देईल?”
11 तेव्हा योनाथानने सुचवले, “चल आपण शेताकडे जाऊ.” आणि ते दोघे ही शेतात गेले.
12 तिथे योनाथान दावीदला म्हणाला, “देव जो, इस्राएलचा परमेश्वर या समोर मी तुला वचन देतो. माझ्या वडीलांच्या तुझ्याबद्दल काय भल्याबुऱ्या भावना आहेत ते मी जाणून घेईन. मग तीन दिवसात तुला तसं इथे याच शेतात कळवीन.
13 त्यांच्याकडून तुला काही घातपात होणार असेल तर तुला त्याची कल्पना देईन. तुला सुखरुप निसटू देईन. माझ्याहातून यात हयगय झाल्यास परमेश्वर मला त्याची शिक्षा देवो. माझ्या वडीलांना परमेश्वराची साथ आहे तशीच तुला मिळो.
14 मी हयात असेपर्यंत तुझा माझ्यावर लोभ असू दे. मी गेल्यावरही
15 माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड न पडो. परमेश्वर तुझ्या वैऱ्यांचा पृथ्वीतलावरुन नि:पात करील.
16 मग त्या वेळी योनाथानच्या कुटुंबाला दावीदपासून वेगळे व्हावे लागले तरी बेहत्तर. देव दावीदाच्या शत्रूंना शासन करो.” मग योनाथानने दावीदाच्या घराण्याशी करार केला.
17 योनाथानने मग दावीदला परस्परांवरील प्रेमाच्या आणाभाका परत घ्यायला लावल्या. दावीदावर त्याचे स्वत: इतकेच प्रेम होते म्हणून त्या प्रेमापोटी त्याने असे केले.
18 योनाथान दावीदला म्हणाला, “उद्या अमावास्येची मेजवानी आहे. पंक्तीतील तुझे आसन रिकामे असेल त्यामुळे तुझी अनुपस्थिती माझ्या वडीलांच्या लक्षात येईल.
19 या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा.
20 तिसऱ्या दिवशी मी तिथे येईन आणि नेमबजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन.
21 आणि हाताखालच्या मुलाला बाण शोधून आणायला पाठवीन. सर्वकाही ठीक असेल तर त्या मुलाला मी म्हणेन, ‘तू खूप लांब गेलास बाण माझ्या जवळ आहेत. तर ये व तो घे.’ जर मी असा म्हणालो तर तू खुशाल बाहेर ये मग, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या सुरक्षिततेची हमी माझ्यावर, कोणताही धोका तेव्हा नसेल.
22 पण काही धोका असल्यास मी म्हणेन, ‘बाण आणखी पुढे आहेत. जा, जाऊन आण.’ तसे मी म्हटले तर मात्र तू निघून जा. प्रत्यक्ष परमेश्वरच तुला लांब पाठवत आहे असे समज.
23 आपल्या दोघांमधला हा करार लक्षात ठेव. परमेश्वर याला साक्ष आहे.”
24 त्यानंतर दावीद शेतात लपून बसला.अमावास्येच्या मेजवानीची वेळ झाली आणि राजा भोजनासाठी बसला.
25 भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते.
26 त्यादिवशी शौल काहीच बोलला नाही. त्याला वाटले, “काही कारणाने आज तो शुचिर्भूत नसेल.”
27 दुसऱ्या दिवशी पुन्हा दावीदाचे आसन रिकामेच राहिले. तेव्हा मात्र शौल योनाथानला म्हणाला, “इशायचा मुलगा या प्रंसगी दिसत नाही. कालही नव्हता, आजही नाही. असे का?”
28 योनाथानने सांगितले, “त्याने माझ्याजवळ बेथलहेमला जायची परवानगी मागितली.”
29 तो म्हणाला, “मला जायला हवे. बेथलहेमला आमच्या कुटुंबात यज्ञ आहे. माझ्या भावाने मला यायची आज्ञा केली आहे. आपल्या मैत्रीला स्मरुन तू मला भावांना भेटायला जायची परवानगी दे.” दावीद आज राजाच्या पंक्तीला नाही याचे हे कारण आहे.”
30 शौल योनाथानवर संतापला. तो म्हणाला, “अरे दासीपुत्रा, तू माझी अवज्ञा करतोस? आणि तू तिच्यासारखाच निपजलास. तू दावीदाच्या बाजूचा आहेस हे मला माहीत आहे. तू तुला आणि तुझ्या आईला लाज आणली आहेस.
31 हा इशायचा मुलगा जिवंत असेपर्यंत तू राज्यावर येणार नाहीस. आत्ताच्या आत्ता दावीदला आणून हजर कर. त्याला मेलेच पाहिजे.”
32 योनाथान आपल्या वडीलांना म्हणाला, “त्याने काय केले? का म्हणून त्याने मेले पाहिजे?”
33 यावर शौलने योनाथानवर आपला भाला फेकला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा, दावीदला मारायचा आपल्या वडीलांनी निश्चय केला आहे हे योनाथानच्या लक्षात आले.
34 संतापाने तो पंक्तीतून चालता झाला. त्या रागात त्याने अन्नाला स्पर्शासुध्दा केला नाही. शौलने आपल्याला शरमिंदे केले आणि दावीदला मारायचे ठरवले म्हणून त्याला फार राग आला.
35 दुसऱ्या दिवशी सकाळी योनाथान शेतावर आला. ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला तो आला. आपल्याबरोबर त्याने मदतनीस मुलालापण आणले.
36 त्याला तो म्हणाला, “धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण.” मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरुन बाण मारले.
37 बाण पडले त्या ठिकाणी तो मुलगा पोचल्यावर योनाथान म्हणाला, “बाण आणखी पुढेच आहेत.”
38 ग तो म्हणाला, “जा धावत जा, लौकर आणि नुसता उभा राहू नको.” मुलाने मग बाण उचलून गोळा करुन आणले.
39 काय चालले आहे याची त्या मुलाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त योनाथान आणि दावीदला ते कळत होते.
40 योनाथानने धनुष्यबाण त्या मुलाकडे दिले आणि त्याला तो म्हणाला, “आता तू गावात परत जा.”
41 मुलगा दिसेनासा झाल्यावर दावीद डोंगराच्या पलीकडे लपला होता तिथून बाहेर आला. त्याने योनाथानला तीनदा वाकून अभिवादन केले. मग त्यांनी परस्परांचे मुके घेतले. दोघेही रडू लागले. पण दावीदाचा आक्रोश योनाथानपेक्षा जास्त होता.
42 योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”

1-Samuel 20:33 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×