मी पाहिले आणि तेथे माइयासमोर पांढरा घोडा होता. घोडेस्वाराने धनुष्य धरले होते. त्याला मुगुट देण्यात आला होता. तो निघाला, शत्रूचा पराभव करीत निघाला, तो विजय मिळविण्यासाठी निघाला.
मी पाहिले तेव्हा लाल रंग असलेला दुसरा घोडा निघाला. घोडेस्वारला पृथ्वीवरुन शांति काढून घेण्याचा अधिकार दिला होता. म्हणजे लोकांनी आपापसांत एकमेकाला ठार करावे. त्याला मोठी तरवार देण्यात आली होती.
जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तेव्हा मी तिसऱ्या जिवंत प्राण्याला बोलताना ऐकले, “ये!” मी पाहिले तेव्हा माइयासमोर काळा घोडा होता व घोडेस्वराच्या हातात तराजू होते असे मला दिसले
मग मी जणू काय चारही जिवंत प्राणी बोलल्यासारखा आवाज ऐकला. ते म्हणत होते, “एक किलो गहू एका दिवसाच्या मजुरीइतके, आणि तीन किलो बार्ली एका दिवसाच्या मजुरीइतकी, मात्र तेल व द्राक्षारस वाया घालवू नका.”
मी पाहिले तेव्हा माइयासमोर फिक्या रंगाचा घोडा मला दिसला. त्यावरच्या घोडेस्वारचे नाव मृत्यु होते. आणि त्याच्या मागोमाग अधोलोक चालला होता. आणि त्यांना पृथ्वीच्या चौथ्या भागावर (पृथ्वीच्या पाव भागावर) लोकांना तरवारीने मारण्याचा, दुष्काळाने आणि पटकीने मारण्याचा व पृथ्वीवरील जंगली हिस्र प्राण्यांकडून मारण्याचा अधिकार दिला होता.
जेव्हा त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी काही आत्मे वेदीखाली पाहिले. त्यांना देवाच्या वचनासाठी आणि त्यांनी राखलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते.
ते मोठ्या आवाजात म्हणाले, “पवित्र आणि सत्य प्रभु, कोठपर्यंत तू पृथ्वीवरील लोकांचा न्याय करणार नाहीस आणि आम्हाला ठार मारल्याबद्दल त्यांना शिक्षा करणार नाहीस?”
त्या प्रत्येक आत्म्याला मग एक एक पांढरा शुभ्र झगा देण्यात आला. आणि त्यांना सांगण्यात आले की, त्यांचे काही बांधव ख्रिस्ताच्या सेवेत आहेत व यांना जसे मारण्यात आले, तसे त्यांनाही मारण्यात येईल व ते पूर्ण होइपर्यंत त्यांनी थोडा वेळ थांबावे.
मग कोकऱ्याला सहावा शिक्का उघडताना मी पाहिले. तेव्हा मोठा भूकंप झाला, सूर्य मेंढीच्या केसांपासून बनविलेल्या काळ्या कापडासारखा झाला, पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला.
मग सर्व लोक गुहेत, पर्वतांच्या, खडकांच्या मागे लपले. त्यामध्ये जगातील राजे, सत्ताधीश, सेनापती, श्रीमंत लोक आणि सामर्थ्यशाली लोक होते. प्रत्येक व्यक्ति, गुलाम किंवा स्वतंत्र लपून बसली.