English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Jeremiah Chapters

Jeremiah 13 Verses

1 परमेश्वर मला असे म्हणाला: “यिर्मया, जा आणि तागाचा घागरा विकत घे. नंतर तो नेस. तो ओला होऊ देऊ नकोस.”
2 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मी एक तागाचा घागरा विकत आणला व नेसला.
3 नंतर मला परमेश्वराकडून दुसऱ्यांदा संदेश आला.
4 तो असा होता: “यिर्मया, तू विकत आणून नेसलेला घागरा घेऊन फरातला जा. तिथे तो खडकाला पडलेल्या चिरेत लपवून ठेव.”
5 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे घागरा लपवून ठेवला.
6 पुष्कळ दिवसांनी देव मला म्हणाला, “यिर्मया, फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला घागरा परत घे.”
7 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि घागरा उकरुन काढला. मी दगडाच्या चिरेत लपविलेला घागरा बाहेर काढला. पण आता तो इतका खराब झाला होता की मी तो नेसू शकत नव्हतो. तो अगदी निरुपयोगी झाला होता.
8 मग मला परमेश्वराचा संदेश आला.
9 परमेश्वर मला म्हणाला, “ज्याप्रमाणे घागरा अगदी खराब आणि निरुपयोगी झाला, त्याचप्रमाणे यहूदातील आणि यरुशलेमधील अहंकारी लोकांचा नाश होईल.
10 मी यहुदाच्या उद्दाम आणि पापी लोकांचा नाश करीन. ते लोक माझा संदेश ऐकण्याचे नाकारतात. ते दुराग्रही असून आपल्याला पाहिजे त्याच गोष्टी करतात. ते दुसऱ्या देवांना अनुसरतात व त्यांची पूजा करतात. यहूदाच्या अशा लोकांची गत ह्या तागाच्या घागऱ्याप्रमाणे होईल. त्यांचा नाश होऊन ते निरुपयोगी ठरतील.
11 घागरा जसा माणसाच्या कमरेभोवती घट्ठ लपेटला जातो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे माझ्या कमरेला लपेटली.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “त्या लोकांनी माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी असे केले. पण माझ्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही.”
12 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना सांग की परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘प्रत्येक चामड्याचा बुधला दारुने भरावा.’ ते लोक तुला हसतील आणि म्हणतील ‘प्रत्येक चामड्याचा बुधला दारुने भरावा हे आम्हाला माहीत आहे.’
13 मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे की या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी दारुड्याप्रमाणे असहाय करीन. मी हे दावीदच्या सिंहासनावर बसलेल्या राजांबद्दल, याजकांबद्दल, संदेष्ट्यांबद्दल आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या यच्चयावत लोकांबद्दल बोलत आहे.
14 यहूदाच्या लोकांना मी धडपडायला भाग पाडीन. ते धडपडून एकमेकांच्या अंगावर पडतील. पिता पुत्र एकमेकांवर पडतील. हा परमेश्वराचा संदेश आहे. “‘मला त्याबद्दल वाईटही वाटणार नाही. आणि त्यांची दयाही येणार नाही. अनुकंपा येऊन मी यहूदाच्या लोकांचे पारिपत्य थांबविणार नाही.”‘
15 ऐका आणि लक्ष द्या. परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे. उन्मत्त बनू नका.
16 परमेश्वराचा, तुमच्या देवाचा मान राखा. त्याचे स्तवन करा, नाहीतर तो अंधकार पसरवील. अंधकारमय टेकड्यांवर पडण्याआधीच त्याचे स्तुतिस्तोत्र गा. तुम्ही यहूदाचे लोक प्रकाशाची वाट पाहता, पण परमेश्वर प्रकाशाचे गाढ अंधकारात रुपांतर करेल. तो प्रकाशाला दाट अंधारात बदलेल.
17 यहूदाच्या लोकांनो, तुम्ही जर परमेश्वराचे ऐकणार नसाल, तर मी एकांतात आक्रोश करीन. तुमचा उन्मत्तपणा मला आक्रोश करायला भाग पाडेल. मी दारुण आकांत करीन. माझे डोळे अश्रूंनी डबडबतील. का? कारण परमेश्वराच्या मेंढरांचा कळप (यहूदाचे लोक) पकडला जाईल.
18 राजा आणि राणीला या गोष्टी सांगा, “तुमचे सुंदर मुकुट तुमच्या डोक्यांवरुन खाली पडलेत. तुम्ही आता तुमच्या सिंहासनावरुन खाली उतरा.”
19 नेगेवच्या वाळवंटातील शहरे बंद केली गेली आहेत. कोणीही ती उघडू शकत नाही. यहूदाच्या सर्व लोकांना कैद करुन परागंदा करण्यात आले आहे.
20 यरुशलेम, तो पाहा! उत्तरेकडून शत्रू चाल करुन येत आहे. तुझा कळप कोठे आहे? देवाने तुला या सुंदर कळपाचे दान दिले. त्याची तू काळजी घ्यावीस अशी अपेक्षा होती.
21 आता त्या कळपाबद्दल परमेश्वराने जाब विचारल्यास तू काय उत्तर देणार? तू लोकांना देवाबद्दल ज्ञान देशील अशी अपेक्षा होती. तुझे नेते लोकांना मार्गदर्शन करतील असे वाटत होते. पण त्यांनी त्यांचे कर्तव्य केले नाही. तेव्हा आता तुला प्रसुतिवेदनांप्रमाणे वेदना व त्रास भोगावा लागेल.
22 तू कदाचित् स्वत:ला विचारशील, “माझ्यावरच असा वाईट प्रसंग का आला?” तुझ्या अनेक पापांमुळे असे झाले. तुझ्या पापाबद्दल तुझा घागरा फाडला गेला आणि तुझी पादत्राणे काढून घेण्यात आली. तुझी मानहानी करण्यासाठी हे करण्यात आले.
23 काळा माणूस आपल्या कातडीचा रंग बदलू शकत नाही. किंवा चित्ता आपल्या अंगावरील ठिपके बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे यरुशलेम, तू सुद्धा बदलणार नाहीस आणि चांगल्या गोष्टी करणार नाहीस तू नेहमीच वाईट गोष्टी करशील.
24 “मी तुम्हाला तुमची घरे सोडून जाण्यास भाग पाडीन. तुम्ही दाही दिशांना सैरावैरा पळत सुटाल, वाळवंटातील वाऱ्याने दूर उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे तुमची गत होईल.
25 तुमच्याबाबत माझी योजना ही अशी आहे आणि त्याचप्रमाणे गोष्टी घडतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “हे असे का घडेल? कारण तुम्हाला माझा विसर पडला. तुम्ही खोट्या देवावर विश्वास ठेवला.
26 यरुशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन. प्रत्येकजण तुला पाहील आणि तुझी बेअब्रू होईल.
27 मी तू केलेली भयानक कृत्ये पाहिली आहेत. जारांशी हसताना आणि संभोग करताना मी तुला पाहिले आहे. वेश्या बनायचेच तुझ्या मनात दिसते आहे. मी तुला डोंगरकपारीत आणि मैदानात पाहिले आहे. यरुशलेम, हे तुझ्या दृष्टीने वाईट आहे. या घृणास्पद पापें तू किती काळ करणार याचे मला नवल वाटते.”
×

Alert

×