ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवीला त्या सूचनांबरहुकूम प्रत्येक गोष्ट कर.”
परंतु येशूला नेमून दिलेली याजकीय सेवा मुख्य याजकांच्या सेवेहून जशी फारच वरच्या दर्जाची आहे, तसाच येशू ज्या नवीन कराराचा मध्यस्थ आहे, तो करार अगोदरच्या कराराहून अधिक वरच्या दर्जाचा आहे, कारण तो करार अधिक चांगल्या वचनांच्या पायावर उभा आहे.
परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएल लोकांबरोबर नवा करार करीन व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन.
ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून इजिप्त देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा कराक करीन; मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात घालीन, त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होइन, ते माझे लोक होतील.
तुमच्या प्रभूला ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या बंधूला अथवा आपल्या देशबांधवाला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.