पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.
शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे:
तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे:
आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत.
त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती.
हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती.
याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.