म्हणून मी त्यास एका बलिष्ट राजाच्या स्वाधीन करीन. तो त्या वृक्षाने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्याला शिक्षा करील. मी त्या वृक्षाला त्याच्या दुष्टाव्याबद्दल माझ्या बागेतून काढून टाकीन.
राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून फेकले. वृक्षाच्या फांद्या डोंगरदऱ्यात पडल्या त्या फांद्या त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांतून वाहत गेल्या. त्या वृक्षाची सावली राहिली नसल्याने, पृथ्वीवरचे सगळे लोक दूर निघून गेले.
“आता, पाण्याजवळचे कोठलेही झाड गर्व करणार नाही. कोणीही ढगापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार नाही. ते पाणी पिणारे मोठे वृक्ष आपल्या उंचीची प्रौढी मिरविणार नाहीत. का? कारण प्रत्येकाला मरण अटळ आहे. त्यांना जमिनीखाली, शेओलमध्ये मृत्यूलोकांत जावे लागणार. इतर मृतांमध्ये, खोल विवरात त्यांना जावे लागणार.”
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “ज्या दिवशी तो वृक्षा शेओलमध्ये मृत्युलोकांत गेला, त्या दिवशी मी लोकांना शोक करायला लावला. मी खोल पाण्याने त्या वृक्षाला झाकले. वृक्षाच्या नद्यांचा प्रवाह मी अडविला. त्यामुळे झाडांकडे वाहणारे पाणी वाहण्याचे थांबले. मी त्याच्यासाठी लबानोनला शोक करायला भाग पाडले. त्या मोठ्या वृक्षाबद्दलच्या दु:खाने मळ्यातील झाडे म्लान झाली.
मी वृक्ष पाडला. त्याच्या आवाजाने राष्ट्र हादरली, घाबरली. मी वृक्षाला मृत्यूलोकांत जायला भाग पाडले. तो वृक्ष इतर लोकांबरोबर खोल विवरात जाऊन पडला. पूर्वी, एदेनमधल्या सर्व वृक्षांनी आणि लबानोनमधील उत्तम झाडांनी तेच पाणी प्यायले होते. धरणीखाली गेलेले ते वृक्ष मग समाधान पावले.
हो! ते वृक्षही मोठ्या वृक्षाबरोबर खाली गेले. ते लढाईत मारल्या गेलेल्या लोकांमध्ये जाऊन मिसळले. त्या मोठ्या वृक्षाने इतरांना बलवान केले होते. राष्ट्रांमध्ये ती झाडे ह्या मोठ्या वृक्षाच्या सावलीला राहिली.
“तेव्हा हे मिसर देशा, एदेनमधल्या कोणत्या मोठ्या, बलवान वृक्षाशी मी तुझी तुलना करावी? तू, मृत्युलोकांत, त्या परदेशीयांबरोबर आणि लढाईत मारल्या गेलेल्या लोकांबरोबर, जाऊन पडशील, फारो आणि त्याची माणसे ह्यांच्याबाबतीत तसेच घडेल.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.