कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हाला अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच बलामला पैसे चारुन त्यांनी त्याला तुम्हांला शाप द्यायला लावले. (मेसोपोटेमियातील पथोर नगरामधला बौर याचा बलाम हा मुलगा.)
आपल्या शस्त्रास्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा.
कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याहातून शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबरच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हांला सोडून जायचा.
पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षात घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत.
“आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याजी लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारु नका.
परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या प्रदेशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.