त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करुन टाकावे. त्याला परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे.
मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रांवर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.
“कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा मतलबी विचाराने कुणाला मदत नाकारु नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हांला पाप लागेल.
“तेव्हा तुम्हांला शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हांला परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हांला यश मिळेल.
त्याला आपल्यातील काही गुरं, धान्यधुन्य, द्राक्षारस द्या. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरभरुन मिळाले आहे. तेव्हा तुमच्या दासालाही सढळ हाताने द्या.
“दासांना मुक्त करुन जाऊ देताना तुम्हाला जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हाला द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षांत ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यात देव तुम्हाला आशीर्वाद देईल.