तरीही देवाच्या लोकांमध्ये खोटे होऊन गेले तसे तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असणार. ते लोकांमध्ये विध्वंसक विचार पसरवतील. आणि ज्या प्रभूने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेतले त्याचा ते स्वीकार करणार नाहीत. असे करण्याने ते स्वत:वर ताबडतोब नाश ओढवून घेतील.
त्यांच्या अधाशीपणामुळे त्यांनी तयार केलेल्या शिकवणुकीने पैशांसाठी तुमची पिळवणूक करतील. फार पूर्वी देवाने त्यांना दिलेली शिक्षा ही पोकळ धमकी नाही तर त्यांचा नाश त्यांची वाट पाहत आहे.
देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही; तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीने राहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावर पाण्याचा महापूर आणाला.
दिवसेंदिवस त्या लोकांमध्ये राहत असताना, त्या नियमविरहीत लोकांमुळे जे तो पाहत व ऐकत होता त्यामुळे त्या चांगल्या मनुष्याला आपले धार्मिक ह्रदय, फाटून जाते की काय असे त्याला वाटत होते.
अशा प्रकारे, प्रभुला, धार्मिक लोकांची त्यांच्या दु:खापासून सुटका कशी करायची हे माहीत आहे आणि त्याला माहीत आहे की न्यायाच्या दिवसापर्यंत दुष्ट लोकांना शिक्षेसाठी कसे ठेवायचे.
विशेषत: जे पापमय वासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोक गौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत.
परंतु हे लोक ज्यांना पकडून मारुन टाकावे अशा देहस्वभावानुसार चालणाऱ्या बुद्धीहीन पशूंसारखे आहेत. ज्या गोष्टींबद्दल ते अज्ञानी आहेत, त्याविरुद्ध हे लोक बोलतात. ज्याप्रमाणे प्राण्यांचा नाश केला जातो, त्याचप्रमाणे (खोट्या शिक्षकांचाही) नाश केला जाईल.
आणि त्यांनी इतरांना दुखावल्याचे आणि अन्यायाचे फळ म्हणून त्यांनाही दुखाविण्यात येईल. भर दिवसा वाईट गोष्ट करण्यात आनंद आहे असे ते लोक मानतात. ते डाग आणि कलंक असे आहेत. ते तुमच्याबरोबर मेजवानीत सामील होताना आपल्या कपटाच्या आनंदात बेभान होतात.
त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडे कामूकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापात ओढतात त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत.
ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या सांगतीपासून सुटकेचा प्रयत्न करु लागले आहेत, अशांची फसवणूक करुन देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात.
हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांना मोकळीक देण्याचे वचन देतात परंतु ते स्वत:च नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडा बसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो.
म्हणून आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त यांची ज्या लोकांना ओळख होते, त्यांची जगाच्या दूषित वातावारणापासून सुटका होते. परंतु नंतर पुन्हा एकदा जगाचे अशुद्ध वातावरण या लोकांवर आपला पगडा बसविते. मग त्यांची शेवटची स्थिती अगोदरच्या स्थितीहून जास्तच वाईट होते.
त्यांना जर चांगला मार्ग माहीत झाला नसता तर चांगले झाले असते कारण चांगला मार्ग माहीत होणे आणि त्या लोकांना दिलेल्या पवित्र शिक्षणापासून त्यांनी वळणे, यापेक्षा (अगोदरची स्थिती चांगली होती.)