1
|
ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला: |
2
|
“काही महिन्यांपूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता, तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते. |
3
|
तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता. तसेच आताही असायला हवे होते असे मला वाटते. |
4
|
मी जेव्हा यशस्वी होतो आणि देव माझा मित्र होता त्या दिवसांची मी आशा करतो. त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते. |
5
|
जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता आणि माझी मुले माझ्या जवळ होती त्या दिवसांची मी आशा धरतो. |
6
|
त्या दिवसांत माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलईत धूत असे. माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेले होती. |
7
|
“त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे. |
8
|
सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहात. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहात असत. |
9
|
लोकप्रमुख बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत. |
10
|
महत्वाचे लोक सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासाखी वाटे. |
11
|
लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत. आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी. |
12
|
का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्याला मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी नसले तर मी मदत करीत असे. |
13
|
मृत्युपंथाला लागलेला माणूस मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे. |
14
|
सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती. |
15
|
मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी नेत असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे. |
16
|
गरीब लोकांना मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांनादेखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे. |
17
|
मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला. |
18
|
“मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन, मला स्वत:च्या घरातच मृत्यू येईल. |
19
|
मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे. |
20
|
मला रोज नवतरुण झाल्यासारखे वाटत असे. रोज नवीन बाण सोडण्याइतकी शक्ती आपल्यात आहे असे मला वाटत असे. |
21
|
“पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहात ते शांत बसत. |
22
|
मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत. |
23
|
पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात. वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत. |
24
|
काही लोकांनी आशा सोडून दिली होती. त्यांचे धैर्य खचले होते. परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्याना बरे वाटले. |
25
|
मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहाण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो. |
Job 29:17 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...