सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी माझा दूत पाठवीत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करील. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभु त्याच्या मंदिरात येईल तुम्हांला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे तो खरोखरीच येत आहे.”
“त्यावेळेची तयारी कोणीही करु शकत नाही. तो येताच, कोणीही त्याच्यासमोर उभा राहू शकणार नाही. तो धगधगत्या अग्नीसारखा असेल. वस्तू अगदी स्वच्छ व्हाव्या म्हणून वापरण्यात येणाऱ्या तीव्र साबणासारखा असेल.
तो लेवीच्या लोकांना स्वच्छ करील. विस्तवात चांदी ज्याप्रमाणे शुध्द केली जाते. तसा तो त्यांना शुध्द करील. तो त्यांना चांदी सोन्याप्रमाणे शुध्द करील. मग ते परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी आणतील आणि सर्व गोष्टी योग्यरीतीने करतील.
मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. लोकांनी केलेल्या वाईट गोष्टी न्यायाधीशाला सांगणाऱ्या माणसाप्रमाणे मी असेन काही लोक दुष्टपणे जादूटोणा करतात. काही व्यभिचाराचे पाप करतात. काही खोटी वचने देतात. काही आपल्या मजुरांना फसवितात. ते मजुरांना कबूल केल्याप्रमाणे मजुरी देत नाहीत. लोक विधवांना व अनाथांना मदत करीत नाहीत. परक्याला कोणी मदत करीत नाही. माझा लोक मान राखत नाहीत.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
पण तुम्ही माझे नियम कधीच पाळले नाहीत. तुमच्या पूर्वजांनीसुध्दा मला अनुसरण्याचे सोडून दिले. तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुमच्याकडे परत येईन.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.“तुम्ही विचारता ‘आम्ही कसे परत येऊ शकतो?’
“देवाकडे चोरी करण्याचे सोडून द्या. देवाकडे चोरी करु नये. पण तुम्ही माझ्या वस्तू चोरल्या.”“तुम्ही मला विचारता, ‘आम्ही तुझे काय चोरले?’“तुम्ही मला तुमच्या वस्तूंचा एक दशांश भाग द्यायला हवा. खास भेटी द्यायला हव्यात. पण तुम्ही हे मला देत नाही.
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “ही परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वाट्यातील दहावा भाग माझ्याकडे आणा. तो भाग खजिन्यात ठेवा. माझ्या घरी अन्न आणा. माझी परीक्षा घ्या. तुम्ही असे केलेत, तर मी तुम्हाला खरेच आशीर्वाद देईन. आकाशातून पडणाऱ्या वृष्टीप्रमाणे तुमच्यावर चांगल्या गोष्टींचा वर्षाव होईल. प्रत्येक गोष्ट तुम्हांला जरुरीपेक्षा जास्त मिळेल.
तुम्ही म्हणालात “परमेश्वराची उपासना करणे व्यर्थ आहे. आम्ही परमेश्वराने सांगितल्याप्रामाणे केले. पण आमचा काहीच फायदा झाला नाही. लोक प्रेतक्रियेच्या वेळी जसे रडतात, तसे आम्ही पाप केले म्हणून शोक केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
देवाचे अनुयायी एकमेकांशी बोलले व परमेश्वराने ते ऐकले. त्याच्या समोर पुस्तक आहे. त्यामध्ये देवाच्या अनुयायांची नावे आहेत. हेच लोक देवाच्या नावाला मान देतात.