अबीमलेखच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांच्या रक्षणासाठी देवाने तोला या न्यायाधीशाची योजना केली. तोला हा पुवाचा मुलगा आणि पुवा दोदोचा. तोला इस्साखारच्या वंशातील होता व एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर या नगरात राहात असे.
इस्राएल लोकांनी परमेश्वराला अमान्य असलेल्या गोष्टी पुन्हा करायला सुरूवात केली. बआल, अष्टारोथ, या दैवतांची तसेच अरामी, सीदोनी, मवाबी, अम्मोनी तसेच पलिष्टी या लोकांच्या दैवतांची त्यानी उपासना करायला सुरुवात केली. आपल्या परमेश्वरापासून ते दूर गेले, त्याची सेवा करणे त्यांनी थांबवले.
त्याच वर्षी गिलादांच्या प्रदेशात, यार्देन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या इस्राएल लोकांचा त्या लोकांनी संहार केला. हा प्रदेश अमोरी लोकांचा होता. या भागातील इस्राएल लोकांना अठरा वर्षे हाल अपेष्टा काढाव्या लागल्या.
अम्मोनी लोक मग यार्देनच्या पलीकडे गेले यहूदा, बन्यामीन आणि एफ्राईम यांच्या वंशजांशी त्यांनी लढाया केल्या. अम्मोनी लोकांमुळे इस्राएल लोकांना फार त्रास भोगावा लागला.
तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. ते म्हणाले, “परमेश्वरा, आम्ही दुष्कृत्य केले आहे. देवाला सोडून आम्ही बआल या भलत्या दैवताची उपासना केली आहे.”
परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मिसरी, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी अशा वेगवेगव्व्या लोकांकडून जेव्हा जेव्हा तुम्हाला जाच झाला तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याकडे गाऱ्हाणे आणलेत. मी तुमची सुटका करत गेलो.