सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला, “माझे वडील दावीद यांना केलीत तशीच मला मदत करा. त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरुचे लाकूड पाठवले होते.
मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ, शब्बाथच्या दिवशी, दर नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे वाहू. इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.
खरं म्हणजे परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणालाही झालं तरी कसं शक्य आहे? स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्याला सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणे मलाही शक्य नाही. मी आपला त्याच्या प्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो. एवढेच.
“तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्याला जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र करता यावे. कोरीव कामाचेही त्याला चांगले शिक्षण मिळालेले असावे. माझ्या वडलांनी निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरुशलेममध्ये काम करील.
लबानोनमधून माझ्यासाठी गंधसरु, देवदार आणि स्वतचंदन यांचे लाकूडही पाठवावे. लबानोनमधले तुझे लाकूडतोड्ये चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे. त्या तुमच्या सेवकाना माझे सेवक मदत करतील.
हिरामने मग शलमोनाला उत्तर पाठवले. त्यात त्याने असा निरोप पाठवला की, “शलमोन, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.”
हिराम पुढे म्हणाला, “इस्राएलचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. राजा दावीदाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोन, तू सूज्ञ आणि विचारी आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वत:साठी राजवाडा बांधायला निघाला आहेस.
त्याची आई दान वंशातील असून त्याचे वडील सोर नगरातले होते. हा कारागिर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्याला सांगितलेली कोणतीही गोष्ट तो तिचे योग्य रेखाटन करुन कोरुन काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या वडलांच्या, माझ्या स्वामी दाविदाच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.
आणि लबानोनमधून आम्ही तुम्हाला हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओडक्यांचे तराफे करुन आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोचते करु. तेथून ते तुम्ही यरुशलेमला न्यावे.”
शलमोनाने यानंतर इस्राएलमधल्या सर्व उपऱ्या लोकांची गणना केली. दावीदाने गणती केली होती त्यानंतरची ही गणती. दावीद हा शलमोनाचा पिता. या गणनेत त्यांना 1,53,600 उपरे लोक मिळाले.
शलमोनाने त्यापैकी 70,000 जणांना ओझी वाहायला निवडले आणि80,000 लोकांना डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या 3,600 उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.