तो आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “तुझी तलवार उचल आणि माझ्यावर चालव. नाहीतर हे परकीय मला भोसकून माझी टिंगल टवाळी करतील.” पण त्या शस्त्रवाहकाने भेदरुन या गोष्टीला नकार दिला.तेव्हा शौलने आपली तलवार उपसली व स्वत:ला भोसकले.
खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या इस्राएली लोकांनी, इस्राएली सैन्याला पळ काढताना पाहिले. शौल आणि त्याची मुले मरण पावल्याचे त्यांना आढळले. तेव्हा त्यांनी ही आपापली गावे सोडून पलायन केले. त्या ठिकाणी मग पलिष्ट्यांनी वस्ती केली.
तेव्हा तेथील सैनिक रातोरात तेथून निघून बेथ-शान येथे पोचले. तेथे गावकुसावर टांगलेला शौलचा मृतदेह त्यांनी काढला. शौलच्या मुलांची प्रेते ही काढली. याबेश येथे त्यांनी हे सर्व मृतदेह आणले आणि याबेश येथील सर्वांनी त्यांचे दहन केले.