वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत सापडलेले, कर्जबाजारी झालेले. आयुष्याला त्रासलेले असे बरेच जण दावीदकडे आले. त्याच्या भोवती अशी चारशे माणसे जमली. त्यांचा तो नेता होता.
अदुल्लामहून तो मवाबातील मिस्पा येथे गेला. मवाबच्या राजाला तो म्हणाला, “परमेश्वराने माझे काय करायचे ठरवले हे मला कळेपर्यंत कृपया माझ्या आईवडिलांना तुमच्या आश्रयाने राहू द्या.”
दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यांचा इतरांना पत्ता लागला आहे हे शौलला कळले. तो गिबा येथे एका टेकडीवर झाडाखाली बसला होता. हातात भाला होता. सर्व अधिकारी त्याच्या भोवती उभे होते.
शौल त्यांना उद्देशून म्हणाला, “बन्यामीन लोकहो, ऐका हा इशायपुत्र दावीद तुम्हाला शेत आणि द्राक्षमळे देईल असे तुम्हाला वाटते का? तो तुम्हाला बढत्या देऊन शंभरांवर, हजारांवर अधिकारी नेमील असे तुम्ही समजता का?
माझ्याविरुद्ध तुम्ही कटकारस्थाने रचत आहात. योनाथान बद्दल तुमच्या पैकी एकानेही मला विश्वासात घेतले नाही. या इशायच्या मुलाबरोबर त्याचा करार झालेला आहे हे कोणी मला सांगितले नाही. तुमच्या पैकी कोणी माझी काळजी घेत नाही. योनाथानने दावीदला प्रोत्साहन दिले हे तुमच्यापैकी कोणीही मला कळू दिले नाही. लपून राहून माझ्यावर हल्ला करायला योनाथानने दावीदला, माझ्या सेवकाला सांगितले. दावीदाचे सध्या तेच चालले आहे.”
हे ऐकून शौलने या याजकाला आपल्यापुढे हजर करायची आज्ञा दिली. त्याच्या सर्व नातेवाईकांनाही आणायला सांगितले. अहीमलेखचे नातेवाईक नोब येथे पुरोहित होते. ते सर्व जण राजासमोर आले.
शौल अहीमलेखला म्हणाला, “तू आणि इशायचा मुलगा दावीद यांनी माझ्याविरुध्द कट का केलात? दावीदला तू भाकर दिलीस व तलवारही पुरवलीस. त्याच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना केलीस आणि आता दावीद हल्ला करायला सज्ज आहे.”
अहीमलेख म्हणाला, “दावीद अतिशय भरवशाचा आहे. तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये त्याच्याइतका विश्वासू कोणी नाही. तो तुमचा जावईही आहे. तुमच्या अंगरक्षकांचा तो प्रमुख आहे. तुमचे कुटुंबीय त्याला मान देतात.
त्याच्यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करायची ही पहिलीच वेळ नव्हे. मला किंवा माझ्या नातेवाईकांना बोल लावू नका. आम्ही तुमचे सेवक आहोत. काय चालले आहे याची आम्हाला अजिबात कल्पना नाही.”
राजाने मग आपल्या जवळच्या रक्षकांना हुकूम केला, “परमेश्वराच्या याजकांना ठार करा. त्यांनी दावीदाची बाजू घेतली म्हणून त्यांना ही सजा आहे. दावीदाच्या पलायनाची त्यांना खबर असून त्यांनी मला तसे कळवले नाही.”पण राजाच्या सेवकांनी परमेश्वराच्या याजकांवर शस्त्र उगारायला नकार दिला.
नोब ही याजकांची नगरी होती. दवेगने तेथील सर्वांना ठार केले. पुरुष बायका, मुले, तान्ही बाळे, इतकेच नव्हे तर गायीगुरे, गाढवे, मेंढरे सुद्धा त्याने तलवारीने कापून काढली.
तेव्हा दावीद अब्याथारला म्हणाला, “मी नोब येथे त्यादिवशी त्या अदोमी दवेगला पाहिले होते. तो शौलला ही खबर देईल हेही मला माहीत होते. तुझ्या वडीलांच्या कुटुंबाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे.