त्यादिवशी शौलचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण खिंडीपलीकडील पलिष्ट्यांच्या छावणीकडे जाऊ. आपल्या वडीलांना मात्र त्याने हे सांगितले नाही.”
त्यातील एकाचे नाव अहीया. शिलो येथे एली म्हणून परमेश्वराचा याजक होता. त्याच्या जागी आता हा होता. अहीयाने एफोद घातला होता. ईखाबोदचा भाऊ अहीदूब याचा हा मुलगा. ईखाबोद फिनहासचा आणि फिनहास एलीचा मुलगा. योनाथान निघून गेला हे लोकांना माहीत नव्हते.
खिंडीच्या दोन्ही बाजूला मोठमोठे सुळके होते. योनाथानने त्यांच्या मधूनपलिष्ट्यांच्या ठाण्यावर जायचे ठरवले. एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसऱ्याचे सेने असे होते.
योनाथान आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “चल त्या परकीयांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आपल्या हातून त्यांचा पराभव करील. सैन्य कमी की जास्त याचा परमेश्वराला काय फरक पडतो?”
पण त्यांनी पुढे यायला सांगितले तर मात्र पुढे व्हायचे. तसे झाले तर ती देवाची खूण समजायची. याचा अर्थ असा की त्यांचा पराभव करण्याची परमेश्वराने आपणास मुभा दिली आहे.”
त्या छावणीतील पलिष्ट्यांनी या दोघांना “वर या म्हणजे चांगला धडा शिकवतो” असे धमकावले. योनाथान आपल्या सेवकाला म्हणाला, “चल माझ्या मागोमाग. परमेश्वर आता आपल्या हातून पलिष्ट्यांना नेस्तनाबूत करील.”
(13-14) योनाथान मग हाता पायांनी आधार घेत घेत तो कडा चढून गेला. त्याचा सेवक त्याच्या पाठोपाठ होताच. दोघांनी मिळून पलिष्ट्यांवर हल्ला चढवला. त्यांनी त्या एक बिघा जमिनीवर पहिल्या चढाईत वीसजणांना ठार केले. समोरुन येणाऱ्यांवर योनाथानने हल्ला केला आणि त्यात जखमी झालेल्यांना योनाथानच्या सेवकाने मागोमाग येऊन ठार केले.
तेव्हा छावणीत, शेतात, किल्ल्यावर पसरलेल्या सर्व पलिष्ट्यांमध्ये घबराट पसरली. चांगल्या शूर सैनिकांनीही धास्ती घेतली. त्यांच्या पायाखालची भूमी कंपायमान झाली आणि पलिष्टी भयभीत झाले.
अहीयाशी बोलत आसताना शौल परमेश्वर काही सल्ला देईल म्हणून वाट पाहात होता. इकडे पलिष्ट्यांच्या ठाण्यावरील गलबला व गोंधळ वाढत चालला. शौलचा धीर सुटत चालला. शेवटी तो याजक अहीया याला म्हणाला, “आता प्रार्थना पुरे. तु थांब.”
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात दडून राहिलेल्या इस्राएलांनी पलिष्ट्यांच्या पलायनाची बातमी ऐकली. तेव्हा तेही युद्धात उतरले आणि त्यांनी पलिष्ट्यांचा पाठलाग सुरु केला.
अशाप्रकारे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलांचा बचाव केला. युद्ध बेथ-आवेन कडे सरकले. जवळ जवळ दहा हजाराचे सर्व सैन्य शौलच्या पाठीशी होते. एफ्राईमच्या डोंगराळ परदेशातील सर्व नगरांमध्ये युद्ध पसरले.
पण शौलच्या हातून त्या दिवशी मोठी चूक झाली. सर्व इस्राएल लोक दमले भागलेले आणि भुकेले होते. शौलने त्यांच्याकडून सक्तीने एक शपथ घेतली होती. “संध्याकाळ व्हायच्या आत आणि शत्रूचा पाडाव करण्यापूर्वी कोणी काही खाल्ले तर त्याला शासन होईल.” अशा त्या शपथेमुळे कोणीही अन्नग्रहण केले नव्हते.
(25-26) लढत लढत लोक रानात शिरले. तिथे त्यांना जमिनीवर मधाचे पोळे दिसले पण ते पाहूनही लोकांनी त्यातील मधाला हात लावला नाही कारण शपथेचा धाक त्यांच्या मनात होता.
आपल्या वडीलांनी सर्वाना बळजबरीने अशी शपथ घ्यायाला लावली आहे याबद्दल योनाथानला काहीच माहीत नव्हते. तेव्हा त्याने आपल्या हातातील काठी पोळ्यात खुपसली आणि मध काढला. थोडा मध खाल्यावर त्याला चांगली तरतरी आली.
एक सैनिक योनाथानला म्हणाला, “तुमच्या वडीलांनी लोकांना शपथ घालून बजावले आहे की आज कोणी काही खाल्ले तर त्याला शाप लागेल. म्हणून लोकांनी काही खाल्लेले नाही. ते भुकेने व्याकुळ झाले आहेत.”
त्यांनी पलिष्ट्यांची मेंढरे गुरे, वासरे लुटून आणली होती. आता ते भुकेने इतके कासावीस झाले होते की त्यांनी ती गुरे तिथेच जमिनीवर मारुन खाल्ली. त्यांचे रक्तसुद्धा चाटले.
तेव्हा एक जण शौलला म्हणाला, “पाहा, हा परमेश्वराच्या दृष्टीने अपराध आहे. ही माणसे तर रक्तासकट मांस खात आहे.”शौल म्हणाला, “तुम्ही पाप केले आहे. आता एक मोठा दगड लोटून येथे आणा.”
पुढे तो म्हणाला, “जा, त्या लोकांना जाऊन सांगा की प्रत्येकाने बैल मेंढरे माझ्यासमोर आणावी आणि मगच त्यांनी ती इथे कापावी. असे पाप करु नका. रक्ताने भरलेले मांस खाऊ नका.”मग सर्वानी आपापली जनावरे तेथे आणली आणि मारली.
तो म्हणाला, “आज रात्री आपण पलिष्ट्यांवर हल्ला करु. त्यांचे सर्व हिरावून घेऊन त्या सर्वाना कापून काढू.”सर्व सैन्याने त्याच्या म्हणण्याला साथ दिली.पण याजक म्हणाला, “आपण परमेश्वराचा कौल मागू.”
म्हणून शौलने परमेश्वराला विचारले, “आम्ही आज पलिष्ट्यांवर चालून जाऊ का? तू आम्हाला त्यांचा पराभव करु देशील का?” पण त्यादिवशी परमेश्वराने शौलला उत्तर दिले नाही.
इस्राएलला तारणाऱ्या परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतो की अगदी माझा पोटचा मुलगा योनाथान याच्याहातून अपराध घडला असेल तरी त्याला देहान्त शासन होईल.” यावर कोणीही चकार शब्द ही काढला नाही.
मग शौलाने प्रार्थना केली, “इस्राएलच्या परमेश्वरा, देवा, आज तू माझी प्रार्थना का ऐकली नाहीस? मी किंवा माझा मुलगा योनाथान याच्या हातून पाप घडले असेल तर उरीम टाक आणि लोकांच्या हातून पाप घडले असेल तर थुम्मीम टाक”शौल आणि योनाथानच्या नावाने दान पडले आणि लोक सुटले.
पण सर्व सैनिक शौलला म्हणाल, “योनाथानने आज इस्राएलकडे विजय खेचून आणला आहे. तेव्हा त्याने मेलेच पाहिजे का? खचितच नाही. आम्ही परमेश्वरापुढे शपथ घेऊन सांगतो की त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पलिष्ट्यांविरुद्ध लढायला परमेश्वराने योनाथानला मदत केली आहे.” अशाप्रकारे लोकांनी योनाथानला वाचवले. त्याला मृत्यूची सजा झाली नाही.
शौलने सर्व अधिकार आपल्या हाती घेऊन राज्य स्थापित केले. मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राज, पलिष्टी इत्यादी इस्राएलच्या भोवतालच्या सर्व शत्रूशी युद्ध केले. शौल जेथे जेथे गेला तेथे तेथे त्यांने शत्रूंचा पाडाव केला.
शौलने आयुष्यभर पराक्रम गाजवले. पलिष्ट्यांचा त्याने कडवा प्रतिकार केला. त्याला कुठेही शूर, पराक्रमी माणूस आढळला की त्याला तो सैनिकात भरती करुन घेई आणि अंगरक्षक म्हणून नेमी.