हा मी इथे आहे. माझ्या हातून काही चुकलेले असेल तर ते परमेश्वराला आणि तुम्ही निवडलेल्या राजाला सांगा. मी कोणाचा बैल किंवा गाढव चोरले आहे का? कोणाला दुखवले किंवा फसवले का? कोणाकडून मी कधी पैसाच काय पण जोडा तरी लाच म्हणून घेतला का? तसे असेल तर मी त्याची भरपाई करीन.”
तेव्हा शमुवेल सर्वाना म्हणाला, “आज या घटनेला परमेश्वर आणि त्याने निवडलेला राजा साक्षी आहेत. तुमचे म्हणणे त्यांनी ऐकले आहे. माझ्याहातून काहीही वावगे घडले नसल्याचे तुमचे मत त्यांना माहीत आहे.” तेव्हा लोक एकमताने म्हणाले, “होय! परमेश्वर त्याला साक्षी आहे.”
याकोब मिसरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्याच्या वंशजांचे जिणे कठीण केले तेव्हा त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली. म्हणून परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना पाठवले. त्यानी मग त्या तुमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले आणि या ठिकाणी आणले.
“पण तुमचे पूर्वज आपला स्वामी जो परमेश्वर त्याला विसरले. तेव्हा परमेश्वराने त्यांना सीसराचे गुलाम बनू दिले. सीसरा हा हासोर येथील सैन्याचा सेनापती होता. त्यानंतर परमेश्वराने त्यांना पलिष्टी आणि मवाबचा राजा यांचे गुलाम बनवले. हे सर्व तुमच्या पूर्वजांबरोबर घडले.
तेव्हा तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली. ते म्हणाले, “आमच्या हातून पातक घडले. परमेश्वराला सोडून बाल, अष्टारोथ या भलत्या दैवतांची आम्ही भक्ती केली. पण आता आमची शत्रूच्या तावडीतून सुटका कर म्हणजे आम्ही फक्त तुझीच सेवा करु.”
पण मग अम्मोन्यांचा राजा नाहाश याला तुमच्यावर चाल करुन येताना तुम्ही पाहिले आणि तुम्हाला संरक्षणासाठी राजा असाव असे वाटले. प्रत्यक्ष परमेश्वर तुमचा देव राजा असतानाही तुम्हाला असे वाटले.
परमेश्वर तुमचे सतत रक्षण करील पण तुम्ही मात्र त्यासाठी खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत; सन्मानपूर्वक परमेश्वराची सेवा करा. त्याच्या आज्ञेविरुध्द जाऊन कोणाशी लढू नका. तुम्ही व तुमचा राजा यांनी परमेश्वर देवालाच मानावे. असे वागल्याने परमेश्वर तुमचे रक्षण करील.
सध्या गव्हाच्या कापणीचे दिवसआहेत. मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्याने ढगांच्या गडाडाटासह पाऊस पाडावा अशी मी विनंती करतो. तेव्हा, राजाची मागणी करुन आपण परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कृत्य केले आहे हे तुम्हाला कळेल.”
ते शमुवेलला म्हणाले, “आम्हा दासांच्या वतीने तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. आम्हाला मरु देऊ नका. आमच्या हातून अनेक पातके घडली आहेत. राजाची मागणी करुन तर आम्ही त्यात आणखी भरच घातली आहे.”
“पण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करत नाही. उलट त्याने मोठ्या प्रेमाने तुम्हाला आपले मानले आहे. तेव्हा त्याच्या मोठ्या नावाखातर तो तुम्हाला सोडून देणार नाही.
आणि माझे म्हणाल, तर मी तुमच्या वतीने नेहमीच प्रार्थना करत राहीन. तसे मी केले नाही तर परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठे पाप ठरेल. चांगले आयुष्य जगायचा योग्य मार्ग मी तुम्हाला दाखवत राहीन.