आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील.
तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील. परमेश्वराने मला सांगितले आहे ‘जर मी सांगितलेल्या मार्गाने मनपासून आणि प्रामाणिकपणाने तुझी मुले चालली तर इस्राएलचा राजा हा नेहमी तुझ्याच वंशातला असेल.”‘
दावीद पुढे म्हणाला, “सरुवेचा मुलगा यवाब याने काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे हे शांततेच्या काळात केले. त्याचा तलवार खोचायचा कमरबंद आणि पायातले सैनिकी जोडे यांवर त्यांचे रक्त शिंपडले आहे. त्याला मीच शासन करायला हवे होते.
पण आता तू राजा आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा तू त्यांना धडा शिकवू शकतोस. तो मारला जाईल याची तू खात्री करुन घे. त्याला शांततेने म्हातारपणी मरण येता कामा नये.
“गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
“गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही.
यानंतर हग्गीथेचा मुलगा अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्याला विचारले, “तू सद्हेतूने आला आहेस ना?”अदोनीया म्हणाला, “हो, ही शांतता भेट आहे.
अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.
अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”
मग बथशेबा राजा शलमोनाकडे गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करुन तो सिंहासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे सिंहासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.
बथशेबा त्याला म्हणाली, “मला एक छोटीशी गोष्ट तुझ्याजवळ मागायची आहे. कृपाकरुन नाही म्हणून नकोस.”राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”
राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी अबीशगेचीच मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी हे राज्यच का मागत नाहीस? बोलून चालून तो माझा मोठा भाऊ आहे. याजक अब्याथार आणि यवाब त्याला पाठिंबा देतीलच.”
इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझ्या वडीलांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”
मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्याघरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडीलांबरोबर मार्गक्रमण करताना परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू त्यांना साथ दिली आहेस”
परमेश्वराचा याजक म्हणून त्याला यापुढे काम करता येणार नाही असे शलमोनाने अब्याथार याजकाला सांगितले. असे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते. अब्याथार याजक एलीच्या कुटुंबातील होता.
हे सर्व यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घटृ धरुन बसला.
बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.”पण यवाबाने तेथेच मरण पत्करायला तयार असल्याचे सांगितले.तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले.
तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर. मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.
नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा या आपल्यापेक्षा चांगल्या अशा दोन माणसांना त्याने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता. माझे वडील दावीद यांना त्यावेळी या हत्येची कल्पना नव्हती. तेव्हा परमेश्वरच यवाबाला त्याच्या कृत्यांबद्दल शासन करत आहे.
त्यांच्या हत्येबद्दल यवाब अपराधी आहे. त्याच्या कुटुंबालाही हे ओझे कायमचे वागवावे लागेल. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”
तेव्हा शलमोनाने त्याला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, ‘यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते. तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील असे मी तुला बजावले होते. आणि तू त्याला कबूल झाला होतास. माझा शब्द पाळायचे तू मान्य केले होतेस.