मिसरमधील शीहोर नदीपासून उत्तरेस एक्रोनच्या सीमेपर्यंतचा भागही अजून काबीज केलेला नाही. त्या भूमीवर अजूनही कनानी लोकांचा ताबा आहे. गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन या पलिष्टचांच्या पाच नेत्यांचा तुला पराभव करायचा आहे.
“लबानोनापासून मिस्रपोथ-माईमपर्यंत पसरलेल्या डोंगराळ भागात सीदोनी राहतात. पण इस्राएल लोकांसाठी मी या सर्वांना तेथून हुसकावून लावीन. इस्राएल लोकांमध्ये तू जमिनीची वाटणी करशील तेव्हा या भागाचेही लक्षात असू दे मी सांगितल्याप्रमाणे वाटे कर.
रऊबेनी, गादी आणि मनश्शाच्या उरलेल्या अर्ध्या वंशातील लोक यांना त्यांचा जमिनीतील वाटा पूर्वीच मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे याने यार्देनच्या पूर्वेकडील भाग त्यांचा दिला.
बाशानमध्ये राज्य करीत असलेल्या ओगची राजधानीही त्यात येत होती. पूर्वी तो अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करत असे ओग रेफाई लोकांपैकी होय. मोशेने पूर्वी या लोकांचा पराभव करून त्यांची भूमी काबीज केली होती.
फक्त लेवी वंशाला तेवढा जमिनीत वाटा मिळालेला नाही त्याऐवजी, इस्राएलांच्या परमेश्वर देवाला अग्नीतून केलेली अन्नार्पणे त्यांना मिळतात. परमेश्वरानेच त्यांना तसे कबूल केले आहे.
म्हणजेच हेशबोन येथील. अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या अखत्यारीतील सर्व मुलुख व पठारावरील सर्व शहरे या हद्दीत होती. मोशेने सीहोन राजाचा व मिद्यानचे मांडलीक अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा यांचा पराभव केला होता. (हे सर्व मांडलीक राजे सीहोनच्या बाजूने लढले होते.) ते तेथेच राहणारे होते.
बेथहाराम, बेथ-निम्रा, सुक्कोथ, साफोन, हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा बाकीचा भाग. एवढा यार्देनच्या पूर्वेकडील खोऱ्याचा भाग त्यांचा होता. गालील सरोवराच्या टोकापर्यंत या जमिनीची हद्द होती.
अर्धा गिलाद, अष्टारोथ व एद्रई (ओग राजाने या तिन्ही शहरात वास्तव्य केले होते.) मनश्शेचा मुलगा माखीर याच्या कुळाला ही जमीन मिळाली. म्हणजेच त्या अर्ध्या वंशाला ही जमीन मिळाली.