“मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या मेंढपाळांविषयी (नेत्यांविषयी) बोल. माझ्यासाठी त्यांच्याबरोबर बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही इस्राएलचे मेंढपाळ स्वत:च फक्त चरत आहात. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्ही कळपाला खायला का घालत नाही?
तुम्ही दुर्बळांना सबळ केले नाही. तुम्ही आजारी मेंढ्यांची काळजी घेतली नाही. जखमींना मलमपट्टी केली नाही. काही मेंढ्या भरकटल्या पण तुम्ही जाऊन त्यांना परत आणले नाही. तुम्ही त्यांना शोधायला गेला नाहीत. नाही! तुम्ही फारच दुष्ट आणि निष्ठुर होता. आणि मेंढ्यांनाही तुम्ही दुष्टपणाने व निष्ठुरतेनेच वागविण्याचा प्रयत्न केला.
“मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो. हिंस्र पशूंनी माझ्या मेंढ्या पकडल्या. खरंच! माझ्या मेंढ्या वन्य प्राण्यांचे भक्ष्य झाल्या. का? कारण त्यांना खरा मेंढपाळ नव्हता. माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपावर लक्ष ठेवले नाही. नाही! त्यांनी फक्त मेंढ्या मारल्या व स्वत:ची पोटे भरली. त्यांनी माझ्या कळपाला खाऊ घातले नाही.”
परमेश्वर म्हणतो, “मी त्या मेंढपाळांच्याविरुद्ध आहे. मी माझ्या मेंढ्या त्यांच्याकडून परत मागीन. मी त्यांच्यावर तोंडसुख घेईन. ह्यापुढे ते माझे मेंढपाळ असणार नाही. मग ते स्वत:च्या तुंबड्या भरु शकणार नाहीत. आणि त्यांच्यापासून मी माझ्या कळपाला वाचवीन. मग माझ्या मेंढ्या त्यांचे भक्ष्य होणार नाहीत.”
मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल, तर त्या भरकटू लागताच, तो त्यांचा शोध घेईल, त्याचप्रमाणे, मी करीन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. त्या अंधाऱ्या व ढगाळ दिवशी, त्या जेथे जेथे विखुरल्या असतील, तेथून तेथून मी त्यांना परत आणीन.
त्या त्या राष्ट्रांतून मी त्यांना परत आणीन. निरनिराळ्या देशांतून मी त्यांना एकत्र आणीन. मी त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी चरु देईन.
“हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन. भटकलेल्यांना मी परत आणीन. जखमी झालेल्या मेंढ्यांना मी मलमपट्टी करीन. दुर्बलांना मी सबळ करीन. मी त्या लठ्ठ व मत्त मेंढपाळांचा मात्र नाश करीन. त्यांना योग्य अशीच शिक्षा मी देईन.”
सुपीक जमिनीवर वाढणारे गवत तुम्ही खाऊ शकता. मग इतर मेंढ्यांचे गवत तुम्ही का चिरडून टाकता? तुम्ही भरपूर शुद्ध पाणी पिऊ शकता. मग तुम्ही इतरांचे प्यायचे पाणी का ढवळता?
“मी माझ्या मेंढ्यांबरोबर एक शांततेचा करार करीन. मी अपायकारक प्राण्यांना या भूमीतून दूर करीन. मग मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहू शकतील आणि रानात सुरक्षितपणे झोपू शकतील.
जी सुंदर आणि प्रसिद्ध होईल, अशी जमीन मी त्यांना देईन. मग त्या देशात त्यांची उपासमार होणार नाही. यापुढे इतर राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही.
मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलच्या लोकांना ती माझी माणसे आहेत हेही कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.