यान्रेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.
अंत्युखिया, इकुन्या, आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मीसोसला ते माझे दु:ख तुला माहीत आहे! परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.
पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव. ती सत्ये ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस.
तुला माहीत आहे की, तू आपल्या अतिबाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनांची माहिती आहे. त्यांच्या ठायी तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे.
प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.