यहोरामच्या जागी यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा सर्वांत धाकटा मुलगा अहज्य याला राजा केले. यहोरामच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामच्या इतर सर्व थोरल्या मुलांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.
अहाबच्या कुटुंबियांनी केले तसेच, परमेश्वराला मान्य नसलेले पापाचरण अहज्याने केले. अहज्याच्या वडलांच्या मृत्यूनंतर अहाबच्या घराण्याने त्याला सल्ला द्यायला सुरुवात केली. त्याचे हे सल्ले अहज्याच्या भल्याचे नव्हते. बदसल्ल्यामुळेच त्याचा मृत्यू ओढवला.
अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामच्या बरोबर अरामचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ-गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा. योराम या लढाईत अराम्यांकडून जायबंदी झाला.
तेव्हा तो दुखण्याला उतार पडावा यासाठी इज्रेल येथे परतला. रामोथ येथे अरामचा राजा हजाएल याच्याशी लढताना तो घायाळ झाला होता. योरामला भेटायला म्हणून अहज्या इज्रेल येथे गेला. यहूदाचा राजा यहोराम याचा अहज्या हा मुलगा. योरामच्या वडेलांचे नाव अहाब. दुखापतीमुळे तो इज्रेला आला होता.
अहज्या (किंवा यहोआहाज) योरामला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी धाडले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामबरोबर निमशीचा मुलगा येहू याला भेटायला गेला. अहाबच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती.
यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या माणसांनी त्याला तो शोमरोनमध्ये लपायच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्याला ठार केले आणि त्यांनी त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वराला शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.
पण यहोशबाथ हिने अहज्याचा मुलगा योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामची मुलगी आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथने योवाशला लपवल्यामुळे अथल्या त्याला मारु शकली नाही.