English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Genesis Chapters

Genesis 27 Verses

1 इसहाक म्हातारा झाल्यावर त्याची दृष्टि मंद झाली व त्याला स्पष्ट दिसेनासे झाले; एके दिवशी त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले,“एसावा, माझ्या मुला;”आणि एसाव म्हणाला, “मी येथे आहे”
2 इसहाक म्हणाला, “पाहा, मी आता म्हातारा झालो आहे, कदाचित लवकरच मी मरेन;
3 तेव्हा तू तुझे धनुष्य व बाणांचा भाता घेऊन शिकारीस जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये.
4 आणि त्या शिकारीचे मला आवडणारे रुचकर जेवण तयार करुन माझ्याकडे आण म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन.”
5 त्याप्रमाणे एसाव शिकारीस गेला.इसहाक एसावला या गोष्टी सांगत असताना रिबका ऐकत होती.
6 ती आपला मुलगा याकोब याला म्हणाली, “नीट लक्ष देऊन ऐक; तुझा बाप एसावाशी बोलताना मी ऐकले;
7 तुझा बाप म्हणाला, “माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करुन माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन.’
8 तेव्हा ऐक, आणि मी सांगते ते कर;
9 चटकन आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगले करडे घेऊन मला आणून दे; मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे जेवण तयार करते,
10 मग ते जेवण तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे मग ते खाऊन तुझा बाप मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.”
11 परंतु याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “माझा भाऊ केसाळ अंगाचा आहे; मी त्याच्या सारखा केसाळ अंगाचा नाही;
12 माझ्या बापाने जर मला चाचपून पाहिले तर मग मी एसाव नाही हे त्यांना समजेल आणि मग फसवणूक केल्याबद्दल माझा बाप मला आशीर्वादाच्या ऐवजी शाप देईल.”
13 तेव्हा रिबका त्याला म्हणाली, “जर काही गडबड झाली तर त्याबद्दलचा दोष मी माझ्या स्वत:वर घेईन, मी सांगते ते कर; लवकर जाऊन दोन करडे माझ्याकडे घेऊन ये.”
14 तेव्हा त्याने जाऊन ते करडे आईकडे आणले; मग तिने त्यांचे त्याच्या बापाच्या विशेष आवडीचे रुचकर जेवण तयार केले;
15 नंतर तिने एसावाच्या आवडीचे कपडे काढले आणि ते धाकट्या मुलाच्या म्हणजे याकोबाच्या अंगावर चढवले;
16 तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व मानेवर लावले;
17 मग तिने स्वत: इसहाकासाठी तयार केलेले विशेष रुचकर जेवण आणून याकोबाला दिले;
18 ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि त्याने बापाला हाक मारली, “बाबा!”त्याचा बाप म्हणाला, “काय मुला; तू कोण आहेस?”
19 याकोब म्हणाला, “मी तुमचा वडील मुलगा एसाव आहे; तुम्ही सांगतिल्याप्रमाणे सर्वकाही करुन मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे; तेव्हा आता उठून जेवावयास बसा व तुमच्यासाठी शिकार करुन आणलेले मांस खा आणि मग मला आशीर्वाद द्या.”
20 परंतु इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “एवढया लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?”याकोब म्हणाला, “कारण तुमच्या परमेश्वराने मला लवकर शिकार मिळू दिली.”
21 मग इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला चाचपून पाहतो, मग चाचपण्यावरुन तू खरेच एसाव आहेस का? ते मला समजेल”
22 तेव्हा याकोब आपल्या बापाजवळ गेला; त्याला चाचपून इसहाक म्हणाला, “तुझा आवाज तर याकोबाच्या आवाजासारख आहे परंतु तुझे हात मात्र एसावाच्या हातासारखे केसाळ आहेत.”
23 तो याकोब आहे असे इसहाकाला समजले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हाता सारखे केसाळ होते; म्हणून त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.
24 तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?”याकोबाने उत्तर दिले, “होय बाबा, मी एसावच आहे.”
25 मग इसहाक म्हणाला, “तू जेवण माझ्याकडे आण, मी ते खाईन, मग तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबाने आपल्या बापाला जेवण दिले; ते त्यानी खाल्ले, त्याने त्यांना द्राक्षमद्यही दिले, आणि ते ते प्याले.
26 मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला मुका दे.”
27 मग याकोब आपल्या बापाजवळ गेला आणि त्याने बापाचे चुंबन घेतले; इसहाकाला एसावाच्या कपडयांचा वासा आला; तेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला; तो म्हणाला,परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या, पिकाने भरलेल्या शेताच्या सुगंधासारख माझ्या मुलाचा सुगंध दरवळत आहे.
28 परमेश्वर तुला भरपूर पाऊस देवो म्हणजे हंगामाच्या वेळी तुझी सुपीक शेते तुला भरपूर धान्य व द्राक्षारस देतील.
29 सर्व लोक तुझी सेवा करोत; राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत; तू तुझ्या भावांवर राज्य करशील; ते तुला वंदन करतील व तुझ्या आज्ञा पाळतील; तुला शाप देणारे शापित होतील आणि तुला आशीर्वाद देणारे आशीर्वादित होतील.”
30 इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले. त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोंच एसाव शिकारीहून आला.
31 त्याने आपल्या बापाच्या विशेष आवडीचे रुचकर भोजन तयार केले, व तो ते घेऊन आपल्या बापाकडे आला, तो बापाला म्हणाला, “बाबा, उठा आणि तुमच्या मुलाने शिकार करुन आणलेल्या मृग मांसाचे हे रुचकर जेवण खा; आणि मग मला आशीर्वाद द्या.”
32 परंतु इसहाक त्याला म्हणाला, “तू कोण आहेस?”त्याने उत्तर दिले, “बाबा, मी तुमचा मुलगा, वडील मुलगा एसाव आहे.”
33 मग इसहाक अतिशय अस्वस्थ झाला; तो म्हणाला, “तर मग तू येण्याअगोदर ज्याने जेवण तयार करुन मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व जेवण खाल्ले आणि त्याला आशीर्वादही दिला. तो आशीर्वाद मागे घेण्यास आता फार उशीर झाला आहे; तो त्याला मिळणार.”
34 एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले तेव्हा त्याला फार राग आला व तो खिन्न झाला; हंबरडा फोडून तो बापाला म्हणाला, “तर मग मला ही आशीर्वाद द्या हो बाबा!”
35 इसहाक म्हणाला, “तुझ्या भावाने मला फसवले; तो आला व तुझा आशीर्वाद घेऊन गेला.”
36 एसाव म्हणाला, “त्याचे नाव याकोब (म्हणजे युक्तीबाज, किंवा युक्तीने हिरावून घेणारा) असे आहे ते त्याला योग्यच आहे; त्याने मला दोनदा फसवले; आहे त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” मग एसाव पुढे म्हणाला, “बाबा माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला आहे काय?”
37 इसहाकाने उत्तर दिले, “नाही बाळा, आता फार उशीर झाला आहे; मी याकोबाला तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे बंधू तुझे सेवक होतील असाही आशीर्वाद दिला आहे; त्याच प्रमाणे त्याला भरपूर धान्य व द्राक्षारस मिळावा असाही आशीर्वाद दिला आहे; तेव्हा माझ्या बाळा, आता तुला द्यावयाला काही राहिले नाही.”
38 परंतु एसाव आपल्या बापाला दिनवणी करीतच राहिला; तो म्हणाला, “बाबा तुमच्याकडे एकच आशीर्वाद होता काय? बाबा, माझे बाबा, मलाही आशीर्वाद द्या हो!” असे म्हणत तो टाहो फोडून रडू लागला!”
39 तेव्हा इसहाक म्हणाला,“तुला चांगल्या सुपीक जमिनीवर राहावयास मिळणार नाही व तुला भरपूर पाऊसही मिळणार नाही;
40 जगण्यासाठी तुला झगडावे लागेल; आणि तु तुझ्या भावाचा गुलाम होशील, परंतु तू स्वतंत्र होण्यासाठी लढशील आणि तुझ्या भावाचे नियंत्रण झुगारुन देशील व त्याच्या पासून वेगळा होशील.”
41 त्यानंतर आपला आशीर्वाद हिरावून घेतल्याबद्दल एसाव याकोबाचा द्वेष करु लागला; एसाव विचार करुन स्वत:शीच म्हणाला, “लवकरच माझा बाप मरुन जाईल आणि बापाच्या वियोगामुळे मला दु:ख होईल; परंतु त्यानंतर मात्र मी याकोबाला ठार मारीन.”
42 याकोबाला ठार मारण्याचा बेताचा रिबकेला सुगावा लागला; तेव्हा तिने त्याला बोलावून घेतले; मग ती त्याला म्हणाली, “माझ्या बाळा, ऐक, तुझा भाऊ तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे;
43 तेव्हा बाळा, मी सांगते ते कर; हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे जाऊन तू लपून राहा.
44 तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडा काळ त्याजकडे राहा.
45 तू त्याला काय केलेस हे थोडया काळाने तो विसरुन जाईल; मग सेवक पाठवून मी तुला मागे बोलावून घेईन एकाच दिवशी मी माझ्या दोन्हीही मुलांना अंतरावे असे न होवो.”
46 मग रिबका इसहाकाला म्हणाली, “तुमचा मुलगा एसाव याने हेथी स्त्रीयांशी लग्न केले, मला त्यांच्यामुळे जीव नकोसा झाला आहे, कारण त्या काही आपल्यापैकी नाहीत; जर याकोबाने ही यांच्या सारख्या स्थानिक स्त्रीयांशीं लग्न केले तर मात्र मी मेलेलीच बरी.”
×

Alert

×