त्याला सांग ‘प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो:“मिसरचा राजा, फारो, मी तुझ्याविरुद्ध आहे. तू नाईल नदीकिनारी पडून राहणारा प्रचंड समुद्रातला राक्षस आहेस. तू म्हणतोस, “ही माझी नदी आहे! मी ही नदी निर्मिली”
(4-5) “पण मी तुझ्या जबड्यात गळ अडकवीन. नाईल नदीतील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील. मी तुला आणि त्या माशांना नदीतून ओढून बाहेर काढीन व जमिनीवर टाकीन. तेथून तुम्हाला कोणी उचलणार नाही वा पुरणार नाही. मी तुम्हाला पक्षी व हिंस्र पशू यांच्या स्वाधीन करीन. तुम्ही त्यांचे भक्ष्य व्हाल.
मगच मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना कळून येईल की मीच परमेश्वर आहे.“मी ह्या गोष्टी का करीन.? कारण इस्राएलचे लोक मिसरवर अवलंबून होते. पण मिसर म्हणजे गवताचे कमकुवत पाते होता.
म्हणून मी (देव) तुझ्याविरुद्ध आहे. मी नाईल नदीच्या पुष्कळ पाटांच्या विरुद्ध आहे. मी मिसरचा संपूर्ण नाश करीन. मिग्दोलपासून सवेनेपर्यंतच नव्हे, तर कुशाच्या सीमेपर्यंतची तुझी सर्व गावे मी ओस पाडीन.
आणि इस्राएलचे लोक पुन्हा कधीही मिसरवर विसंबणार नाहीत. इस्राएल लोकांना त्यांचे पाप आठवेल. मदतीसाठी देवाकडे न जाता आपण मिसरकडे गेलो हे त्यांना आठवेल आणि त्यांना समजेल की मीच परमेश्वर, प्रभू, आहे.”
“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सैन्याला सोरविरुद्ध जोराची लढाई करायला लावली. त्यांनी प्रत्येक सैनिकाचा गोटा केला. ओझी उचलून त्यांच्या खांद्याची सालटी निघाली. नबुखद्नेस्सरने व त्याच्या सैन्याने सोरचा पराभव करण्यासाठी खूप कष्ट घेतले. पण ह्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले नाही.”
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मिसरची भूमी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यास देईन. तो मिसरच्या लोकांना घेऊन जाईल. मिसरमधील मौल्यवान वस्तूही तो घेईल. हा नबुखद्नेस्सरच्या सैन्याचा मोबदला असेल.
“त्याच दिवशी, मी इस्राएलाच्या लोकांना सामर्थ्यवान करीन. मग तू त्यांच्याशी बोलू शकशील आणि त्यांचे लक्ष तुझ्याकडे जाईल.त्यांना मीच परमेश्वर आहे.” हे कळेल.