Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

2 Chronicles Chapters

2 Chronicles 20 Verses

Bible Versions

Books

2 Chronicles Chapters

2 Chronicles 20 Verses

1 यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनीलोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटवर चालून आहे.
2 काही लोकांनी येऊन यहोशाफाटला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करुन येत आहे. ती हससोन-तामार!” (म्हणजेच एन - गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.)
3 यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वराला काय करावे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली.
4 तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले.
5 यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांमध्ये तो उभा राहिला.
6 तो म्हणाला,“आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रांमधल्या सर्व राज्यांचा तूच शास्त्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.
7 तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलांदेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस.
8 अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाखातर त्यांनी मंदिर बांधले.
9 ते म्हणाले, ‘तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे. संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु. आमची हाक ऐकून तू आम्हाला सोडव.’
10 “पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेइर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांना तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही.
11 पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हाला आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हाला बहाल केला आहेस.
12 “देवा, या लोकांना चांगले शासन कर. आमच्यावर चाल करुन येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हाला काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आम्ही मदतीसाठी तुझ्याकडे आलो आहोत.”
13 यहूदातील सर्व मंडळी आपल्या बायका आणि तान्ह्या मुलांसकट सर्व मुलाबाळांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती.
14 तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा मुलगा. जखऱ्या बनायाचा मुलगा. बनाया यईएलचा मुलगा. आणि यईएल मत्तन्याचा मुलगा. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत
15 यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरुशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. ‘एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे.
16 उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल.
17 तुम्हाला या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हाला आढळून येईल. यहूदा आणि यरुशलेम लोक हो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.”
18 यहोशाफाटने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरुशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली.
19 कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली.
20 यहोशाफाटचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरुशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”
21 यहोशाफाटने लोकांना प्रोत्साहन दिले व सुचना दिल्या.परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यानी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराने स्तवन करा कारण त्याची प्रीति सर्वकाळ आहे.”
22 लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने चाल करुन आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेइर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.
23 अम्मोनी आणि मवाबी लोक सेइर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेइरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.
24 यहूदा लोक वाळवंटातील टेहळणीच्या बुरुजापाशी आले. शत्रूचे विशाल सैन्य कुठे दिसते का हे ते पाहू लागले पण त्यांना फक्त जमिनीवर विखुरलेले मृतदेह तेवढे दिसले. कोणीही जिवंत राहिला नव्हता.
25 यहोशाफाट आणि त्याचे सैन्य लुटीसाठी मृतदेहांपाशी आले. त्यात त्यांना खूप गुरेढोरे, धन, कपडेलत्ता आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्या त्यांनी स्वत:ला घेतल्या. लूट एवढी होती की ती यहोशाफाट आणि त्याचे लोक यांना नेता येईना. ती प्रेतांमधून काढून न्यायला त्यांना तीन दिवस लागले.
26 चौथ्या दिवशी यहोशाफाट आणि त्याचे सैन्य बराखच्या खोऱ्यात जमले. याठिकाणी त्यांनी परमेश्वरला, धन्यवाद दिले. म्हणून आजही या खोऱ्याचे नाव “आशीर्वादाचे खोरे” असे आहे.
27 मग यहोशाफाटने समस्त यहूदा आणि यरुशलेम लोकांना यरुशलेम येथे माघारे नेले. परमेश्वराने त्यांच्या शत्रूचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदीआनंद पसरला होता.
28 यरुशलेमला येऊन ते सतारी, वीणा व कर्णे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले.
29 परमेश्वराने इस्राएलच्या शत्रु सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला.
30 त्यामुळे यहोशाफाटच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.
31 यहोशाफाटने यहूदा देशावर राज्य केले. राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची मुलगी.
32 आपले वडील आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. तो मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटने केले.
33 पण उच्चस्थाने काढण्यात आली नव्हती. लोकांनीही आपले मन आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळवले नव्हते.
34 “हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटच्या बाकीच्या कृत्यांची साद्यंंत नोंद आहे. ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथातही या गोष्टींचा समावेश करुन त्यांची नोंद केली आहे.
35 इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले.
36 तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन - गेबर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली.
37 पुढे अलियेजर ने यहोशाफाटविरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा मुलगा. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.

2-Chronicles 20:21 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×