राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “देवाने शलमोनाला निवडले आहे. शलमोन अजून कोवळा तरुण आहे. या कामासाठी काय करायला लागेल त्याची त्याला पूर्ण कल्पना नाही. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे घर काही सामान्य माणसाचे नव्हे; ते परमेश्वराचे देवाचे निवासस्थान आहे.
माइया देवाच्या मंदिराची योजना करण्यात मी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. सर्व वस्तूंसाठी लागणारे सोने-चांदी, पितळ मी दिलेले आहे. एवढेच नव्हे तर लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि शुभ्र संगमरमर हे ही देऊ केले आहे. परमेश्वराच्या मंदिरासाठी अशा अनेकविध गोष्टी मी दिल्या.
कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोनेरुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलींपैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”
महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग - पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस.
हे परमेश्वर देवा, तुझे मंदिर उभारायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. तुझ्या सन्मानार्थ आम्ही हे मंदिर बांधत आहोत पण ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे.
हे देवा, लोकांची तू पारख करतोस आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामणिक मनाने हे सगळे तुला सानंद अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत; हे मी पाहतो आहे.
अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा, हे परमेश्वरा, तूच देव आहेस. त्यांनी उचित तेच करावे म्हणून तू सर्वतोपरी सहाय्य कर. त्यांची मने तुझ्याठायी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहावीत याची तू काळजी घे.
शलमोन तुझ्याशी एकनिष्ठ राहावा म्हणून त्याचे मन तुझ्याठायी स्थिर कर. तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे पालन त्याने करावे, या सर्व गोष्टी कराव्या आणि माझ्या नियोजित मंदिराची उभारणी त्याने करावी म्हणून त्याला सात्विक मन दे.”
तेथे जमलेल्या सर्व लोकांना उद्देशून दावीद पुढे म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वराला लोकांनी धन्यावाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.
दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. 1,000 गोऱ्हे, 1000 एडके, 1,000 कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलींसाठी त्यांनी आणखीही पुष्कळ यज्ञ केले.
मग परमेश्वासमोर सर्व लोकांनी खाद्यपेयांचा मनमुराद आस्वाद लुटला.दावीदाचा मुलगा शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला.राजपदासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकला अभिषेक केला गेला. हे सर्व परमेश्वरासमोर झाले.
त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपल्या वडीलांची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत.
परमेश्वराने शलमोनाची भरभराट केली. परमेश्वराच्या कृपेने तो मोठा होत आहे हे इस्राएलींना ठाऊक होते. राजाला शोभेल असा दरारा परमेश्वराने त्याला प्राप्त करुन दिला. इस्राएलाच्या या आधीच्या कोणाही राजाच्या वाट्याला असे भाग्य आले नव्हते.
(26-27) इशायाचा मुलगा दावीद याने संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. दावीद हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरुशलेममध्ये त्याची कारकीर्द 33वर्षांची होती.
पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्याला सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्याला कमतरता नव्हती. त्याच्यानंतर त्याच्या मुलगा शलमोन राजा झाला.
इस्राएलचा राजा म्हणून त्याने जे जे केले ते सर्व या लेखनात आलेले आहे. त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि अवतीभवतीचे सर्व देश यांच्यावर या काळात गुदरलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.