सात वाट्या असलेल्या सात देवदूतांपैकी एक जण माइयाकडे आला आणि मला म्हणाला, “ये, मी तुला त्या अति नीच वेश्येला झालेली शिक्षा दाखवतो. ती बहुत जलांवर बसली आहे.
मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले. तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्र्वापदावर बसलेले पाहिले. त्या श्र्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती. त्या श्र्वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे होती,
त्या स्त्रीने किरमिजी व जांभळी वस्त्रे घातली होती. तिने घातलेल्या सोने, जवाहिर व मोत्यांनी ती चमकत होती. तिच्या हातात सोन्याचा पेला होता, हा पेला वाईट गोष्टींनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता.
मी पाहिले ती स्त्री रक्तसेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयी सांगितले त्याचे रक्त ती प्याली होती. जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो.
मग देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्र्वापदावर बसली आहे, ज्याला सात डोकी व दहा शिंगे आहेत त्याचे रहस्य सांगतो.
जो श्र्वापद तू पाहिला तो (पूर्वी) होता, आता तो नाही. आणि तो तळविरहीत बोगद्यातून येईल आणि नष्ट केला जाईल. पृथ्वीवर राहणारे लोक ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात पृथ्वीच्या स्थापनेपासून लिहिलेली नाहीत ते जेव्हा श्र्वापदाला पाहतील, तेव्हा ते आश्चर्यचकित होतील कारण तो (पूर्वी) होता, आता तो नाही आणि तरी तो येईल.
ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे. आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”
तो श्र्वापद आणि दहा शिंगे तू पाहिलीस ते त्या वेश्येचा तिरस्कार करतील. ते तिला ओसाड, उजाड करतील आणि तिला नग्न सोडून देतील, ते तिचे मांस खातील, व अग्नीने तिला जाळतील.
देवाचे वचन पूर्ण होईपर्यंत, देवाने त्या श्र्वापदाला सत्ता चालविण्याचा अधिकार देण्याचे कबूल केले आहे. देवाने त्याचा हेतु पूर्ण करण्याचे त्यांच्या मनात घातले आहे.