परमेश्वराने मोशेद्वारे दिलेली आज्ञा अहरोनाने मानून त्याने तसे केले; त्याने त्या दिव्यांची तोंडे योग्य दिशेकडे करुन ते योग्य ठिकाणी ठेविले, त्यामुळे दीपवृक्षासमोरील भागावर त्यांचा उजेड पडला.
त्यांना शुद्ध करण्यासाठी पापार्पणातील पवित्र पाणी त्यांच्यावर शिंपड म्हणजे त्या पाण्यामुळे ते शुद्ध होतील. मग त्यांनी आपल्या अंगावरील केस काढावेत आणि आपले कपडे धुवावेत; त्यामुळे ते शुद्ध होतील.
“मग लेवी लोकांना आपले हात गोऱ्ह्यांच्या डोक्यावर ठेवण्यास सांग एक गोऱ्हा परमेश्वरासाठी पापार्पण म्हणून व दुसरा होमार्पण म्हणून होईल. ह्या अर्पणामुळे ते लेवी लोक शुद्ध होतील.
इस्राएल लोकांनी लेवी लोक मला द्यावेत. ते माझे होतील. पूर्वी मी प्रत्येक इस्राएलास सांगितले होते की प्रत्येक घरातून प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा. परंतु आता इतर इस्राएलातील प्रथम जन्मलेल्या मुलांच्या ऐवजी मी लेवी लोक घेत आहे.
इस्राएलात प्रथम जन्मलेला प्रत्येक नर माझा आहे; मग तो माणसापैकी असो किंवा पशूपैकी असो, तो माझाच आहे; कारण मी मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मारुन टाकिले आणि म्हणून प्रथम जन्मलेले मुलगे मी माझ्याकरता निवडून घेतले.
इस्राएल लोकातून मी लेवी लोक निवडले आहेत आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना मी ते दान म्हणून देत आहे. दर्शनमंडपात लेवी लोकांनी सर्व इस्राएल लोकाकरिता काम करावे अशी माझी इच्छा आहे. ते इस्राएल लोकांसाठी असलेली प्रायाश्चिताची अर्पणे करतील त्यामुळे इस्राएल लोक शुद्ध होतील. मग इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले तरी त्यांना भारी आजार किंवा त्रास होणार नाही.”
लेवी लोकांनी स्नान केले व, आपले कपडे धुतले. तेव्हा अहरोनाने त्यांना ओवळणी च्या अर्पणाप्रमाणे परमेश्वराला अर्पिले, आणि त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करुन त्याने त्यांना शुद्ध केले.
त्यानंतलेवी लोक सेवा करण्यास दर्शनमंडपात आले. अहरोन व त्याच्या मुलांनी त्यांच्यावर देखरेख केली; कारण ते लेवी लोक करीत असलेल्या सेवेबद्दल जबाबदार होते. परमेश्वराने मोशेकडून अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकांचे सर्व काही केले.
त्या वर्षाच्या अथवा त्याहून मोठे असलेल्या लेवी माणसांनी पाहिजे तर दर्शनमंडपात सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी; परंतु त्यांनी स्वत: सेवा करु नये. लेवी लोकांना सेवा करण्यास निवडून घेताना तू हा नियम पाळावा.”