“मग त्यांनी पवित्र मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे पवित्र भाकरही त्यावर ठेवावी.
मग त्यांनी दीपवृक्ष आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी.
“मग पवित्र स्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत व ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या उत्तम कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे.
नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, फावडी व कटोरे हे वेदीचे सर्व सामान गोळा करुन ते वेदीवर ठेवावे; मग तिच्यावर तहशाच्या उत्तम कातड्याचे आच्छादन घालावे व मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत.
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत.
“पवित्र निवासमंडप व त्यातील सर्व सामान व उपकरणे म्हणजे पवित्रस्थान व त्यातील दिव्यांना लागणारे तेल. सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे व अभिषेकाचे तेल ह्या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.”
तुम्ही ही कामे करावीत म्हणजे मग कहाथी लोक परम पवित्र स्थानाजवळ जातील तेव्हा ते मरणार नाहीत; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी परमपवित्रस्थानात जाऊन कहाथी लोकांतील एकेका माणसाला त्याने कोणकोणत्यावस्तू वाहून न्याव्यात ते सांगावे व ते दाखवावे.
पवित्रनिवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराजा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, हे सर्व सामान गेर्षोनी कुळांनी वहावे; आणि ह्या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे;
अहरोन आणि त्याचे मुलगे यांनी झालेल्या सर्व कामाची पाहणी करावी. त्यांनी गेर्षोनी लोक जे जे वाहून नेतील आणि इतर जे काही काम करतील त्यावरही नजर ठेवावी. तुम्ही त्यानी वाहावयाच्या वस्तूची कल्पना त्यांना द्यावी. ते वाहून नेत असलेल्या वस्तूची जबाबदारी त्यांच्यावर आहे असे त्यांना सांगावे
तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या माणसांच्या नावांवी यादी करा व प्रत्येकाने नेमके काय वाहून न्यायचे ते त्याला सांगा.
तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व सैन्यात सेवा केलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली; त्यांना दर्शनमंडपासाठी खास काम देण्यात आले. इस्राएल लोकांचे प्रवासात दर्शनमंडप वाहून नेण्याचे विशेष सेवेचे काम त्यांना देण्यात आले.
तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक माणसाची गणती करण्यात आली; प्रत्येक माणसाला त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले.