“इस्राएल लोकांना असे सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल त्यावेळी त्या देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याचा समय पाळावा.
पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा म्हणजे परमेश्वराकरिता हा पवित्र शब्बाथाचा विसावा असावा, त्यावर्षी शेते पेरु नयेत आणि द्राक्षमळयाची छाटणी करु नये.
त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे, आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही “योबेल” म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.
हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी “योबेल” वर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेल कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत;
तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या “योबेल” वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा; तुम्हाला जमीन विकावयाची असेल तर “योबेल” वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा; त्या वर्षावरुन खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल कां? कारण तो फकत पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हाला विकत आहे.
जर वर्षे खूप असतील, तर किंमत जास्त असेल. जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हाला खरोखरी फक्त काही पिकेच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल.
तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमतेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरिता खंडणी भरुन ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी.
तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि त्याला त्याने जमीन विकली असेल त्याला शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी.
पण ते वतन परत मिळविण्याची त्याला ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
“एखाद्या माणसाने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्याला हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील.
परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाही तर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यान्पिढ्या त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही.
एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत.
तुम्ही त्यांचा ताबा आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील; त्या लोकांना तुम्ही कायमचे गुलाम करुन घ्यावे; पण तुमच्या इस्राएल भाऊबंदानी आपला अधिकार एकमेंकावर कठोरपणाने चालवू नये.
“तुझा एखादा परदेशीय किवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहात असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल;
किंवा त्याचा चुलता, चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग ह्यांना त्याला सोडवता येईल किंवा तो स्वत:चा धनवान झाला तर त्याला स्वत: पैसे भरुन स्वत:ची सुटका करुन घेता येईल.
“त्याला विकत घेणाऱ्या परदेशीयाच्या बरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा आणि वर्षाच्या संख्येप्रमाणे विक्रीची किंमत ठरवावी; कारण खरे पाहता त्या मालकाने त्याला फकत थोडी वर्षे मजुराच्या रोजाप्रमाणे लावल्यासारखेच आहे!
योबेलास बरीच वर्षे असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे; ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील.