ती भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वराला अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्याला परमपवित्र होय.”
त्याकाळीं कोणा एक इस्राएल स्त्रीला मिसरी-पुरुषापासून झालेला एक मुलग होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल माणसाशी भांडू लागला.
तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करुन शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नांव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती;
“तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या माणसाच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्याला दगडमार करुन मारुन टाकावे.
जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला अवश्य जिवे मारावे.
मोशेने इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.