कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या माणसाला आपल्या लोकातून बाहेर टाकावे.
“तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक कापू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका.
आपला द्राक्षमळाही झाडुन सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळयात खाली पडलेली फळे गोळा करु नका; गोरगरीबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
“बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा-त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
“न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्यांना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या.
“आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगूं नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघाडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
“तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका; दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरु नका; भिन्न सूत एकत्र करुन विणलेला कपडा अंगात घालू नका.
“एकाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरुन मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीर संबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारु नये;
आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.
“तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोंचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळ झाडे लावाल, तेव्हा फळ झाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊं नयेत.
“तू आपल्या मुलीला वेश्या बनून भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका.
तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय माणसाला स्वदेशीय माणसासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एके काळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!