मग परमेश्वर यहोशवाला म्हणला, “भिऊ नको, हात पाय गाळू नको. सर्व योध्द्यांना घेऊन आय वर चाल करून जा. आयच्या राजाचा पराभव करायला मी मदत करीन. तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी मदत करीन. तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी तुमच्या हाती देईन.
यरीहो नगर आणि त्यांचा राजा यांचा तुम्ही पाडाव केलात तसाच आय नगराचा आणि राजाचाही कराल. फक्त यावेळी सर्व संपत्तीची लूट तुम्ही स्वत:साठी ठेवू शकता. येथील गुरेढोरे व संपत्ती तुम्ही आपापसात वाटून घ्या. आता आपल्या सैन्याला नगराच्या पिछाडीला दबा धरून बसण्यास सांग.”
त्यांना आज्ञा केली, “मी काय सांगतो ते सक्षपूर्वक ऐका. नगराच्या मागील बाजूस दबा धरून बसा. हल्ल्याच्या योग्य वेळेची वाट पाहा. फार लांब जाऊ नका. टेहेळणी करत तयारीत राहा.
हे लोक आमचा पाठलाग करत नगरापासून दूर येतील. पूर्वींप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत असे त्यांना वाटेल (त्यांचा हा समज कायम ठेवायला) आम्ही पळत सुटू.
मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्िचमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान एका जागी दबा धरून बसले. आणि यहोशवा आपल्या इतर माणसांबरोबर त्या रात्री राहिला.
अशाप्रकारे त्याने आपल्या सैन्याला सज्ज ठेवले होते. मुख्य छावणी शहराच्या उत्तरेला होती. इतर माणसे परिचमेला दबा धरून बसली होती. रात्री यहोशवा त्या दरीत राहिला.
आयच्या राजाने इस्राएलाचे सैन्य पाहिले तेव्हा तो व नगरातील माणसे इस्राएलांशी युध्द करण्यास लगबगीने निघाली. राजा नगराच्या पूर्वेला गेला. त्यामुळे नगराच्या पिछाडीला लपलेले सैन्य त्याला दिसले नाही.
दबा धरून बसलेल्या इस्राएलांनी हे पाहताच आपल्या जागा सोडल्या आणि ते तात्काळ नगरावर चालून गेले. नगरात शिरून त्यांनी त्याचा ताबा घेतला. लगेचच त्यांनी नगरात जाळपोळ सुरू केली.
आयचे लोक मागे वळून पाहतात तो त्यांना नगर जळताना दिसले. धूर आकाशात चढत होता. हे पाहून त्यांचे अवसान गळाले. इस्राएलांचा पाठलाग त्यांनी सोडून दिला. त्याबरोबर इस्राएल लोकांनी धावायचे थांबले. माघारे फिरून ते आयच्या लोकांबर तुटून पडले. आता आयच्या लोकांना पळता भुई थोडी झाली.
ते पाहून लपून राहिलेली आणखी माणसे त्यांच्यावर चाल करू आली. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी चाल करून येऊन इस्राएलांनी आयच्या लोकांची चांगलीच कोंडी केली. त्यांनी आयचा पराभव केला. आय वासियांपैकी एकहीजण जिवंत राहिला नाही की निसटून जाऊ शकला नाही.
या लढाईत इस्राएलाच्या सैन्याने आयच्या लोकांचा मोकळ्या मैदानात तसेच वाळवंटात पाठलाग करत त्या साऱ्यांची कत्तल केली. नंतर ते नगरात परतले व तेथे उरलेल्या सर्वांची हत्या केली.
आयच्या राजाला यहोशवाने एका झाडावर फाशी दिले आणि संध्याकाळपर्यंत त्याचे प्रेत तसेच तेथे टांगत ठेवले. सूर्यास्ताच्या वेळी त्याने ते लोकांना उतरवायला सांगितले. त्यांनी ते झाडावरून काढून नगराच्या वेशीपाशी टाकले. व तो मृतदेह दगडाधोंड्यांनी झाकून टाकला. तीही रास आज तशीच आहे.
परमेश्वराचा सेवक मोशे याने वेद्या कशा बांधाव्यात हे इस्राएल लोकांना सांगितले होते. तेव्हा, मोशेच्या नियमशास्त्रात लिहून ठेवल्या बरहुकूम यहोशवाने ती बांधली. त्यासाठी कोणत्याही हत्याराचा स्पर्श न झालेले अखंड पाषाण वापरले. अशा वेदीवर त्यांनी होमार्पणे तसेच शांत्यार्पणे वाहिली.
यावेळी सर्व वडीलधारी माणसे, अंमलदार, न्यायाधीश व इतर इस्राएल लोक पवित्र करारकोशाभोवती उभे होते. हा परमेश्वराचा पवित्र करारकोश वाहून नेणाऱ्या लेवी याजकांसमोर ते उभे होते. उपस्थितात मूळचे इस्राएल लोक तसेच परकेही होते. त्यांच्यापैकी निम्मे एबाल पर्वतासमोर तर निम्मे गरिज्जीम पर्वतासमोर उभे राहिले. परमेश्वरचा सेवक मोशे याने आशीर्वादाच्या वाचनासाठी त्यांना तसे उभे राहायला सांगितले होते.