तो म्हाणाला, “तुमच्या परमेश्वर देवाच्या पवित्र करार कोशासमोर नदीच्या मध्यभागी जा. तेथून प्रत्येकाने एकएक दगड उचलून आणा. इस्राएल मधील आपापल्या कुळाचे प्रतीक म्हणून तो राहील. तेव्हा असा दगड खांद्यावर घेऊन या.
परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहून नेत असताना नदी दुभंगली व परमेश्वराने यार्देनेचा प्रवाह रोखला ही गोष्ट इस्राएलांच्या कायम स्मरणात राहावी म्हणून हे दगड आहेत असे त्यांना सांगा.”
इस्राएल लोकांनी यहोशवाचे ऐकले. त्यांनी नदीच्या प्रवाहातून इस्राएलाच्या प्रत्येक कुळासाठी एक याप्रमाणे बारा दगड उचलून आणले. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली त्याप्रमाणे ते वागले. ते दगड वाहून आणून त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन ठेवले.
लोकांनी आता काय करावे हे सांगण्याची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिली. मोशेनेही यहोशवाला याच गोष्टी सांगितल्या होत्या. हे सर्व होईपर्यंत परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन याजक नदीच्या मध्यभागी उभे राहिले. आणि लोकांनी भराभर नदी पार केली.
रऊबेनी, गादी आणि मनश्शाचा अर्धा वंशातील लोक मोशेच्या सांगण्याप्रमाणे हत्यारबंद होऊन, नदी ओलांडून इतरांच्यापुढे गेले. परमेश्वराने द्यायचा कबूल केलेला प्रदेश मिळवून द्यायला ते उर्वरित इर्साएल लोकांना मदत करणार होते.
सर्व इस्राएल लोकांच्या मनात त्या दिवशी परमेश्वराने यहोशवाबद्दल थोर असे महत्व बिंबवले. तेव्हापासून पुढे त्याचे आयुष्य असेपर्यंत त्यांनी मोशे प्रमाणेच यहोशवाविषयी आदर बाळगला.
यहोशवाचे ऐकून याजक करारकोश घेऊन नदीच्या पात्रातून बाहेर आले. याजकांचे पाय जमिनीला लागताच पाणी पुन्हा पूर्ववत वाहू लागले. नदी पुन्हा पहिल्यासारखी दुथडी भरून वाहू लागली.
““तेव्हा तुमच्या परमेश्वर देवाने नदीचा प्रवाह रोखला होता. आम्ही तांबडा समुद्र ओलांडला त्यावेळी झाले तसेच येथेही लोकांनी नदी ओलांडेपर्यंत नदीचे पात्र कोरडे होते. तांबडा समुद्रही परमेश्वराने असाच आटवला होता.’