अदोमाहून हा कोण येत आहे? तो बस्राहून येतो. त्याची वस्त्रे लालभडक आहेत. तो त्या वस्त्रांत अत्यंत सुंदर दिसत आहे. तो त्याच्या सामर्थ्यामुळे ताठ मानेने चालत आहे. तो म्हणतो, “माझ्याजवळ तुम्हाला वाचवायचे सामर्थ्य आहे आणि मी सत्य बोलतो”
तो उत्तरतो, “मी स्वत:च द्राक्षकुंडावरून चाललो मला कोणी मदत केली नाही. मी रागावलो होतो आणि मी द्राक्षे तुडविली. तो रस माझ्या वस्त्रांवर उडाला. म्हणून माझी वस्त्रे आता मळीन झाली आहेत.
मी सभोवर पाहिले. पण मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मला मदत केली नाही म्हणून मला आश्चर्य वाटले. म्हणून मी माझ्या लोकांना वाचविण्यासाठी माझे स्वत:चे सामर्थ्य वापरले. माझ्या स्वत:च्या रागाची मला मदत झाली.
परमेश्वर कृपाळू आहे ह्याचे मी स्मरण ठेवीन. परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन. इस्राएलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या. परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे. परमेश्वराने आमच्यावर दया केली.
लोकांपुढे अनेक संकटे होती. पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द नव्हता. परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती. म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले, त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.
पण पूर्वी काय घडले याची परमेश्वराला अजून आठवण आहे. मोशे आणि त्याची माणसे त्याला आठवतात. त्यांना समुद्रपार करणारा तोच एकमेव परमेश्वर आहे. परमेश्वराने त्याच्या मेंढपाळांना (संदेष्ट्यांना) कळप (माणसे) वळवायला लावले. पण मोशेला आपला आत्मा देणारा तो परमेश्वर आता कोठे आहे?
परमेश्वराने मोशेला उजव्या हाताने पुढे नेले. परमेश्वराने आपल्या विलक्षण सामर्थ्याचा उपयोग मोशेला पुढे नेण्यासाठी केला. लोकांना समुद्रातून पलीकडे जाता यावे म्हणून परमेश्वराने पाणी दुभंगविले. असे चमत्कार घडवून देवाने आपली कीर्ती वाढविली.
ज्याप्रमाणे गाय शेतातून चालताना पडत नाही, त्याप्रमाणे लोक समुद्र ओलांडताना पडले नाहीत. देवाच्या आत्म्याने लोकांना विश्रांतिस्थानाला नेले. सर्व काळ लोक सुरक्षित राहिले. परमेश्वरा, ह्याप्रमाणे तू लोकांना पुढे नेलेस. तू लोकांना मार्गदर्शन केलेस आणि तुझ्या नावाभोवती अदभुततेचे वलय निर्माण केलेस.
परमेश्वरा, स्वर्गातून खाली पाहा. आता काय घडत आहे ते पाहा. तुझ्या स्वर्गातील महान आणि पवित्र घरातून खाली आमच्याकडे बघ. आमच्याबद्दलचे तुझे ते आत्यांतिक प्रेम कोठे आहे? तुझ्या अंत:करणातून येणारी तुझी ती सामर्थ्यशाली कृत्ये कोठे आहेत? माझ्याकरिता असलेली तुझी दया कोठे आहे? तुझे कृपा युक्त प्रेम तू माझ्यापासून का लपवून ठेवीत आहेस?
हे बघ! तू आमचा पिता आहेस. अब्राहामला आम्ही माहीत नाही. इस्राएल (याकोब) आम्हाला ओळखत नाही. परमेश्वरा, तूच आमचा पिता आहेस. आम्हाला नेहमी वाचविणारा तूच एक आहेस.
परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्यापासून दूर का ढकलीत आहेस? तुला अनुसरणे तू आम्हाला कठीण का करीत आहेस? परमेश्वरा, आमच्याकडे परत ये. आम्ही तुझे सेवक आहोत. आमच्याकडे ये आणि आम्हाला मदत कर. आमची कुटुंबे तुझ्या मालकीची आहेत.