ऊठ, सियोन ऊठ. कपडे घालून तयार हो. बलशाली हो. पवित्र यरूशलेम, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर. ज्यांनी देवाला अनुसरायचे नाकारले आहे असे लोक पुन्हा कधीही तुझ्यात प्रवेश करणार नाहीत. ते लोक शुध्द आणि निर्मळ नाहीत.
तुझ्या अंगावरची धूळ झटक, चांगली वस्त्रे परिधान कर. यरूशलेम, सियोनकन्ये, तू उठून बस, तू कैदी होतीस. पण आता तुझ्या गळ्याभोवती आवळल्या गेलेल्या पाशापासून स्वत:ची मुक्तता कर.
काय घडले आहे ते आता पाहा दुसऱ्या एका राष्ट्राने माझ्या लोकांना ताब्यात घेतले आहे. माझ्या लोकांना गुलामाप्रमाणे ताब्यात घेणारे हे राष्ट्र कोणते? माझ्या लोकांना गुलाम म्हणून घेताना त्यांनी काहीही किंमत मोजली नाही. हे राष्ट्र माझ्या लोकांवर सत्ता गाजविते. त्यांची थट्टा करते. ते लोक नेहमीच माझी निंदा करतात.”
परमेश्वर म्हणतो, ‘असे घडले आहे. पण त्यामुळेच माझ्या लोकांना माझी ओळख पटेल. मी कोण आहे हे त्यांना कळेल. लोकांना माझा लौकिक कळेल आणि त्यांच्याशी बोलणारा मी म्हणजेच तो आहे हे समजेल.’
“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.
यरूशलेमा, तुझ्या नाश झालेल्या इमारती पुन्हा आनंदित होतील. तुम्ही सर्व मिळून आनंद साजरा कराल का? कारण परमेश्वराने त्याच्या लोकांना सुखी केले आहे. त्याने यरूशलेमला मुक्त केले आहे.
तुम्ही बाबेल सोडाल. पण ते तुम्हाला घाईने बाबेल सोडण्याची सक्ती करणार नाहीत. ते लोक तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडणार नाहीत. तुम्ही निघून याल. आणि परमेश्वर तुमच्याबरोबर असेल. परमेश्वर तुमच्या पुढे असेल. आणि इस्राएलचा देव तुमच्या पाठीशी असेल.
पण त्यांना अधिकच आश्चर्य वाटेल. राजे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहातील पण ते एकही शब्द बोलणार नाहीत. माझ्या सेवकाची गोष्ट ह्या लोकांनी ऐकलेली नाही. काय झाले ते त्यांनी पाहिले. त्यांनी जरी ती गोष्ट ऐकली नसली तरी त्यांना ती सर्व समजलेली आहे.”