तू आता खूप मेहनत केली पाहिजेस. तुझी चांगली वस्त्रे आणि बुरखा उतरव तू जात्यावर धान्य दळले पाहिजेस. पुरूष तुझे पाय पाहू शकतील एवढे तुझे वस्त्र वर उचलून धर आणि नद्या पार कर. तुझा देश सोड.
“मी माझ्या लोकांवर रागावलो होतो ते लोक माझे आहेत पण मी रागावलो असल्याने त्यांचे महत्व कमी केले. मी त्यांना तुझ्या ताब्यात दिले. तू त्यांना शिक्षा केलीस. पण तू त्यांना अजिबात दया दाखविली नाहीस. तू वृध्दांनासुध्दा खूप मेहनत करायला लावलीस.
तेव्हा ‘सभ्य स्त्रिये,’ आता माझे ऐक! तुला आता सुरक्षित वाटते व तू स्वत:शीच म्हणतेस, ‘मीच तेवढी महत्वाची व्यक्ती आहे. माझ्यासारखे महत्वाचे कोणीही नाही. मी कधीच विधवा होणार नाही. मला नेहमीच संतती होईल.’
एके दिवशी, एका क्षणात तुझ्याबाबत पुढील दोन गोष्टी घडतील. पहिली तू तुझी मुले गमावशील आणि नंतर दुसरी म्हणजे तू तुझा पती गमावशील. हो! ह्या गोष्टी तुझ्याबाबत खरोखरच घडतील. तुझी सर्व जादू आणि तुझ्या प्रभावी युक्त्या तुला वाचविणार नाहीत.
तू दुष्कृत्ये केलीस आणि तरी तुला सुरक्षित वाटते. मनातल्या मनात म्हणतेस ‘माझी दुष्कृत्ये कोणालाच दिसत नाहीत.’ तुझे शहाणपण आणि ज्ञान तुला वाचवील असे तुला वाटते. ‘मीच एकमेव आहे. माझ्यासारखे महत्वाचे कोणी नाही’ असा विचार तू स्वत:शीच करतेस.
“पण तुझ्यावर संकटे येतील हे केव्हा होईल ते तुला कळणार नाही. पण तुझा नाश जवळ येत आहे. तू ती संकटे थोपवू शकणार नाहीस. काय होते आहे हे कळायच्या आतच तुझा नाश होईल.
“जादूटोणा आणि चेटूक शिकण्यासाठी तू आयुष्यभर मेहनत केलीस. तेव्हा आता त्याचा उपयोग करायला सुरवात कर. कदाचित् त्या युक्त्या तुझ्या उपयोगी पडतील; कदाचित् तू कोणाला घाबरवू शकशील.
तुला खूप सल्लागार आहेत. त्यांनी दिलेल्या सल्याचा तुला वीट आला का? मग ग्रहनक्षत्रे पाहून ज्योतिष सांगणाऱ्यांना पाठव. ते तुला महिन्याची सुरवात कधी आहे हे सांगतात; तर कदाचित् तुझा त्रास कधी सुरू होणार हे ही सांगू शकतील.
“पण ही माणसे स्वत:चा बचाव करण्यासही समर्थ असणार नाहीत. ते गवताच्या काडीप्रमाणे जळतील. ते इतक्या चटकन् जळतील की भाकरी भाजायला निखारे पेटणार नाहीत की उबेला आगोटी राहणार नाही.
“तू ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतलीस त्या गोष्टींच्या बाबतीत असेच होईल. तू आयुष्यभर ज्यांच्याबरोबर व्यापार केलास ते सर्व तुला सोडून जातील. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जाईल. तुला वाचवायला कोणीही राहणार नाही.”