माझ्या पुढील प्रश्नांना उत्तरे द्या:पूर्वेकडून येणाऱ्या माणसाला कोणी उठविले? चांगलुपणा त्याच्याबरोबर आहे. तो त्याच्या तलवारीच्या जोरावर राष्ट्रांना पराभूत करतो मग त्यांची जणू माती होते. तो तीर सोडतो आणि राजांना जिंकतो. वाऱ्याने गवताची काठी उडावी तसे ते दूर पळतात.
ह्या गोष्टी कोणी घडवून आणल्या? हे कोणी केले? सुरवातीपासून लोकांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वराने, या गोष्टी केल्या आरंभापासून मी म्हणजे परमेश्वर आहे, आरंभापूर्वीही मी येथे होतो आणि सर्व संपल्यावर मीच येथे असेन.
एकजण मूर्ती करण्यासाठी लाकूड कापतो. तो सोन्याचे काम करणाऱ्याला उत्तेजन देतो. दुसरा हातोडीने धातू मऊ करतो. तो ऐरणी वर घाव घालणाऱ्याला उत्तर देतो हा शेवटचा कामगार म्हणतो, ‘हे काम चांगले झाले. सोने आता निघून येणार नाही.’ नंतर तो खिळ्याने मूर्ती पायावर पक्की बसवितो. मग मूर्ती खाली पडू शकत नाही आणि ती कधीही सरकत नाही.”
बहुमोल यहुदा, घाबरू नकोस. इस्राएलमधील माझ्या लाडक्या लोकांनो, भिऊ नका. मी खरोखरच तुम्हाला मदत करीन.” परमेश्वराने स्वत:च ह्या गोष्टी सांगितल्या. जो तुम्हाला वाचवितो तोच इस्राएलचा पवित्र देव हे बोलला.
“मी तुम्हाला कोऱ्या मळणीयंत्राप्रमाणे केले आहे. त्या यंत्राला खूप तीक्ष्ण दाते आहेत. शेतकरी त्याचा उपयोग टरफलांपासून धान्य वेगळे करण्याकरिता करतात. त्याचप्रमाणे तुम्ही डोंगर पायाखाली तुडवून चिरडून टाकाल. तुम्ही टेकडयांची अवस्था धान्याच्या भुसकटाप्रमाणे कराल.
तुम्ही त्या फेकून द्याल आणि वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या सगळीकडे विखुरल्या जातील. नंतर तुम्ही परमेश्वराबद्दल आनंद मानाल. तुम्हाला इस्राएलच्या पवित्र (देवाबद्दल) अभिमान वाटेल.”
“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
वैराण टेकड्यांवर मी नद्या वाहायला लावीन आणि दऱ्यांतून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन. मी वाळवंटाचे रूपांतर पाण्याने भरलेल्या सरोवरात करीन. त्या शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
लोक हे सर्व पाहतील आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामुळेच हे सर्व झाले आहे हे त्यांना कळेल. हे सर्व घडवून आणणारा एकमेव पवित्र (देव) आहे हे लोकांना, हे सर्व पाहिल्यावर कळेल.”
तुमच्या मूर्तीनी (खोट्या देवांनी) यावे व काय घडत आहे ते सांगावे. “सुरवातीला काय झाले? भविष्यात काय घडणार आहे? ते आम्हाला सांगा. आम्ही लक्षपूर्वक ऐकू. मग नंतर काय घडणार आहे ते आम्हाला कळेल.
काय घडेल हे समजण्यासाठी कोणत्या गोष्टी आम्ही पाहाव्या ते आम्हाला सांगा. मग आमचा तुमच्यावर खरोखरचे देव म्हणून विश्वास बसेल. काहीतरी चांगले किंवा वाईट करा म्हणजे आम्हाला तुम्ही प्रत्यक्षात आहात, जिवंत आहात हे दिसेल व आम्ही तुम्हाला अनुसरू.
“मी उत्तरेकडील एका माणसाला उठविले तो उगवत्या सूर्याच्या दिशेकडून म्हणजे पूर्वेकडून येत आहे. तो माझी उपासना करतो. कुंभार ज्याप्रमाणे चिखल तुडवितो, त्याप्रमाणे तो विशिष्ट माणूस राजांना तुडवेल.”
हे सर्व घडण्यापूर्वी आम्हाला कोणी सांगितले? त्याला आम्ही देव म्हणावे, तुमच्या कोणात्या मूर्तीने हे सांगितले का? नाही. त्या मूर्तीपैकी कोणीही आम्हाला काहीही सांगितले नाही. त्या मूर्ती एक शब्दसुध्दा बोलत नाहीत. आणि आपण बोललेले ते खोटे देव ऐकू शकत नाहीत.