असे जर झाले तर वारा व पाऊस ह्यापासून बचाव करण्यासाठी जसा अडोसा असतो तसा राजा निवाऱ्याची जागा होईल. वाळवंटातील झऱ्याप्रमाणे अथवा उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा लोकांना तो वाटेल.
मूर्ख माणूस मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो आणि मनात वाईट गोष्टींचे बेत आखतो. त्याला चुकीच्याच गोष्टी करायच्या असतात. तो परमेश्वराबद्दल वाईटसाईट बोलतो. तो भुकेलेल्यांना अन्न खाऊ देत नाही. तहानेलेल्यांना पाणी पिऊ देत नाही.
तो मूर्ख दुष्टपणाचा उपयोग हत्यारासारखा करतो. गरीबांना लुबाडण्याच्या योजना तो करतो. तो गरीबांबद्दल खोटेनाटे सांगतो आणि ह्यामुळे गरीब न्यायापासून वंचित होतात.
आता तुम्हाला सुरक्षित वाटते पण आणखी एक वर्षाने तुम्ही अडचणीत याल. का? कारण तुम्ही पुढच्या वर्षी द्राक्षे गोळा करू शकणार नाही. पुढच्या वर्षी द्राक्षाचे पीक येणार नाही.
स्त्रियांनो, आता तुम्ही शांत आहात पण तुम्हाला भिती वाटली पाहिजे. आता तुम्हाला सुरक्षित वाटते, पण तुम्ही चिंता केली पाहिजे. तुमची चांगली वस्त्रे काढा आणि शोकप्रदर्शक कपडे घाला. ते कपडे तुमच्या कमरेभोवती गुंडाळा.